भाजपच्या मोठ्या नेत्याने काढला चिमटा; म्हणाले, सरकारी गाडी घेऊन फिरणे म्हणजे सत्ता नव्हे

Union Minister Nitin Gadkari lashes out at Congress
Union Minister Nitin Gadkari lashes out at Congress

नागपूर : भाजप कधी सत्तेत येईल असे कोणालाही वाटत नव्हते. भाजपचे काम करणाऱ्यांना लोक मूर्खात काढायचे. कॉंग्रेसमध्ये येण्याचा सल्ला द्यायचे. मात्र, आज परिवर्तन झाले आहे. कॉंग्रेसने 66 वर्षांत केला नाही तेवढा विकास मोदी सरकारने केला आहे. केवळ पाच-सात लोकांनी लालदिव्यांची गाडी घेऊन फिरणे म्हणजे सत्ता नव्हे असे चिमटेही केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी काढले. 

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळास एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद रॅलीत ते बोलत होते. आज केद्रासह राज्यात परिवर्तन झाले आहे. केंद्रासह अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. मोदी सरकारने बहुमताने सत्ता स्थापन केली आहे. मात्र, येथपर्यंत पक्षाला आणण्यासाठी अनेकांनी खस्ता खाल्ल्या, बलिदान दिले, जीवनच झिजवले. त्यामुळे आज भाजप उभी आहे, असेही गडकरी म्हणाले.

सत्ता आपल्यामुळे आली असे कोणी म्हणत असेल ते साफ चुकीचे आहे. खरे श्रेय जनसंघाच्या काळात बलिदान देणाऱ्यांचे आहे. याचे स्मरण नितीन गडकरी यांनी उपस्थितांना करून दिले. ऑनलाइन झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. 

साखर नको इथेनॉल घ्या

साखर कारखाने म्हणजे सोन्याचे अंडी देणारी कोंबडी आहे. मात्र, आज तीन वर्षे पुरेल एवढी देशात साखर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अवघ्या 22 रुपये किलोने साखर उपलब्ध आहे. त्यामुळे आता साखर काढणे म्हणजे कारखाना बंद करणे होय. मात्र, कारखाने बंद झाल्यास सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे भाजपने सर्वाधिक मदत केली आहे. कारखान्यांना जगविण्यासाठी इथेनॉल निर्मितीचे धोरण आखले, असे नितीन गडकरी म्हणाले.

भविष्यात पेट्रोलला इथेनॉलच पर्याय

भविष्यात पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलच राहणार आहे. बजाज स्कूटरने आणि टीव्हीएसने इथेनॉलवर चालणारी गाडी बाजारात आणली आहे. पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली असल्याने जास्तीत निर्यात आणि कमीत कमी आयात असे धोरण आखण्यात आले आहे. यातून मोठ्या प्रमाणात भारतीय उद्योगांची साखळी निर्माण होणार असल्याचेही गडकरी यांनी भाषणात सांगितले. 

भारत निश्‍चितच आत्मनिर्भर होईल

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याच नेतृत्वात भारत निश्‍चितच आत्मनिर्भर होईल. पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली आहे. याचे सकारात्मक पर्याय दिसायला लागले आहे. याला आपल्यालाच बळकट करायचे आहे, असेही केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com