सुरेश प्रभू म्हणाले, विदर्भात रोजगाराच्या मोठ्या संधी; औद्योगिकीकरणाच्या मार्गाने आत्मनिर्भर होण्याची गरज...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जून 2020

अर्थसत्ता मजबूत असलेला चीन हा देश कोरोनामुळे संकटात सापडला आहे. अशात भारतीयांना आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारने औद्योगिक विकासाचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजचे अवलोकन करून आता विदर्भातील तरुणांना आत्मनिर्भर व्हावे लागेल. वैदर्भीयांमध्ये औद्योगिकीकरणाची क्षमता आहे.

नागपूर : केवळ आरोग्य क्षेत्रातील नव्हे तर नैसर्गिक आणि अर्थविश्‍वातील संकट देखील भविष्यात रौद्ररूप धारण करणार आहेत. त्यासाठी देशातील प्रत्येक व्यक्तीने तयार राहायला हवे. विदर्भात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे. फक्‍त तरुणांना औद्योगिकीकरणाच्या मार्गाने आत्मनिर्भर व्हावे लागेल, असे मत माजी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्‍त केले. 

वनराई फाउंडेशनच्या वतीने "लॉकडाउननंतर भविष्याकडे पाहताना' या विषयावर आयोजित ऑनलाईन संवाद कार्यक्रमात (वेबिनार) ते बोलत होते. याप्रसंगी सुरेश प्रभू यांनी लॉकडाउननंतर निर्माण होणाऱ्या आव्हानांची पूर्वकल्पना करून दिली. आरोग्य क्षेत्रातील कोरोना महामारीचे संकट निवळेल, लवकरच त्याची लस देखील येईल. मात्र, असे संकट भविष्यात पुन्हा येणार नाही असे आपण ठामपणे सांगू शकत नाही. त्यासाठी आपल्याला आता तयार व्हावे लागेल.

क्लिक करा - का दिला सीबीएसई शाळांना कारवाईचा इशारा, जाणून घ्या

हे संकट दिवसेंदिवस रौद्ररूप धारण करीत आहे. कारण, आपण निसर्गाचे संरक्षण केले नाही. त्यामुळे स्वतःचे स्वास्थ चांगले ठेवायचे असल्यास आपल्याला निसर्गाचे संरक्षण करावे लागेल. शिवाय अर्थविश्‍वातील निर्माण होणाऱ्या वादळाला देखील धैर्याने तोंड द्यावे लागेल असे सुरेश प्रभू म्हणाले. 

अर्थसत्ता मजबूत असलेला चीन हा देश कोरोनामुळे संकटात सापडला आहे. अशात भारतीयांना आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारने औद्योगिक विकासाचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजचे अवलोकन करून आता विदर्भातील तरुणांना आत्मनिर्भर व्हावे लागेल. वैदर्भीयांमध्ये औद्योगिकीकरणाची क्षमता आहे. ती त्यांनी ओळखावी व केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन प्रकाशाचा विकास साधावा. आपला विकास हा देशाचा विकास ठरणार आहे, असेही सुरेश प्रभू म्हणाले. 

वनराई फाउंडेशनने पर्यावरण संवर्धनाचा संकल्प हाती घेतला आहे. त्यांच्या या कार्याला गती यावी यासाठी सर्वांना एकत्रित यावे लागेल, असे आवाहन देखील सुरेश प्रभू यांनी केले. प्रास्ताविक वनराई फाउंडेशनचे डॉ. गिरीश गांधी यांनी केले. संचालन अजय पाटील यांनी केले. डॉ. पिनाक दंदे यांनी आभार मानले.

अधिक माहितीसाठी - तुकाराम मुंढेंचा दणका : फडणवीस यांच्या कार्यकाळातील कर्मचाऱ्यांना केले पुन्हा बडतर्फ

आपला विकास झाल्यास देशाचा विकास

केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या योजनांचा अभ्यास करून विदर्भातील तरुणांनी अधिकाधिक स्वतःची प्रगती साधावी. आपला विकास झाल्यास देशाचा विकास निश्‍चित होईल. हेच धोरण अवलंबावे, असे आवाहन माजी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी केले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbha youth should become self-reliant through industrial development