काय हे, पालकांच्या मोबाईलवर मुलांचा ताबा, कुठे नेट नाही, तर कुठे रिचार्जची चिंता...

मनोहर घोळसे
सोमवार, 1 जून 2020

काही शाळांकडे विद्यार्थ्यांचे किंवा त्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर उपलब्ध आहेत, तर काही शाळांकडे उपलब्ध नसले तरी त्यात आधुनिक सुविधा नाहीत. त्यामुळे पालकांचे मोबाईल नंबर मिळविण्यात शिक्षकांची धावाधाव सुरू आहे. कुठे पालकांच्या मोबाईलवर मुलांनी ताबा मिळविला आहे, तर काही ठिकाणी स्मार्टफोन खरेदीसाठी पालक जुळवाजुळव करीत आहेत.

सावनेर (जि.नागपूर) :  कोविड-19 मुळे राज्यात लॉकडाउन सुरू असून, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा व महाविद्यालये बंद आहेत. लॉकडाउन अजून किती काळ राहणार, याविषयी निश्‍चितपणे कोणी सांगू शकत नाही. सध्या शैक्षणिक क्षेत्रात संभ्रमाची स्थिती निर्माण आहे. दरम्यान मोबाईलवरून शिक्षण विभागाच्यावतीने ऑनलाइन शिक्षण देणे सुरू केले असले तरी ग्रामीण भागातील गरीब पालकांच्या खिशाला ते परवडण्यासारखे नसल्याचे दिसून येत आहे.

हेही नक्‍की वाचा  :  (Video) टोळधाड आल्याचे समजताच गृहमंत्री शेतक-यांच्या बांधावर

"ऑनलाइन' उपक्रम "ऑफलाइन' ठरणार?
शाळा बंदच्या दिवसात विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण सुरू राहावे म्हणून शासनातर्फे "शाळा बंद; पण शिक्षण सुरू' हा उपक्रम शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविला जात आहे. यासाठी शिक्षण विभागाने काही "ऍप' व लिंक तयार केल्या आहेत. तालुकास्तरावर संपूर्ण मुख्याध्यापकांचे व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार करून दररोज या ग्रुपवर शालेय उपक्रमासंबंधित प्रत्येक वर्गाकरिता पोस्ट टाकली जात आहे. त्यानुसार, संबंधित मुख्याध्यापक आपापल्या शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना पाठवीत आहेत.
मात्र, या ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे बहुतांश ठिकाणी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा  : (Video)ं पिल्लू घेत आहे "ऑनलाइन' शिक्षण

रिचार्ज करणे पालकांसाठी चिंतेचा विषय
काही शाळांकडे विद्यार्थ्यांचे किंवा त्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर उपलब्ध आहेत, तर काही शाळांकडे उपलब्ध नसले तरी त्यात आधुनिक सुविधा नाहीत. त्यामुळे पालकांचे मोबाईल नंबर मिळविण्यात शिक्षकांची धावाधाव सुरू आहे. कुठे पालकांच्या मोबाईलवर मुलांनी ताबा मिळविला आहे, तर काही ठिकाणी स्मार्टफोन खरेदीसाठी पालक जुळवाजुळव करीत आहेत. ग्रामीणच्या काही ठिकाणी विशेष करून दुर्गम भागात "नेट कव्हरेज; उपलब्ध नसणे तसेच गरीब व सर्वसामान्य पालकांसाठी महागडा रिचार्ज चिंतेचा विषय ठरत असल्याने "लॉकडाउन'च्या काळात शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सुरू केलेला "ऑनलाइन' अभ्यासक्रमाचा उपक्रम "ऑफलाइन' ठरेल काय, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

सुर्वाता :  पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना पुस्तके

उपक्रम चांगला; पण अडचणी..!
तालुक्‍यातील खापरखेडा येथील महाराष्ट्र विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या वेळीच शाळेतील हजेरी रजिस्टरवर विद्यार्थ्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंद केल्याने "शाळा बंद; पण शिक्षण सुरू' हा उपक्रम येथील मुख्याध्यापक लक्ष्मण राठोड व उपमुख्याध्यापक चंद्रशेखर लिखार यांच्या मार्गदर्शनात शाळेतील शिक्षकांतर्फे विद्यार्थ्यांच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवरून राबविला जात आहे. मात्र, यात काही समस्या असल्याचे येथील उपमुख्याध्यापक चंद्रशेखर लिखार यांचे म्हणणे आहे. ते सांगतात, वर्गात विद्यार्थी संख्या 40 असेल, तर यापैकी दहा ते पंधरा पालकांकडेच स्मार्टफोन उपलब्ध आहेत. त्यातही कामावर जाणारे पालक मोबाईल सोबत घेऊन जातात. कुणाकडे व्हॉट्‌सऍप ऍप नाही, तर कुठे "नेट कव्हरेज' नाही, अशा समस्या आढळून येत असल्याने यावर तोडगा निघाल्यास ही ऑनलाइन शिक्षणप्रणाली ग्रामीण क्षेत्रात प्रभावशाली ठरू शकेल, असे असे त्यांचे ठाम मत आहे.

हेही वाचा  :  कोरोना सोडविणार रिक्‍त जागेचे गणित

महागडा रिचार्ज केव्हापर्यंत?
हेटी गावातील पालक चंदू नागपुरे जवळच्याच एका खासगी कारखान्यात काम करतात. परिस्थिती जेमतेम त्यांना दोन मुले आहेत. ते सांगतात, स्मार्टफोन आहे; पण एक त्यामुळे मुलाला द्यावा लागतो. मुलीकरिता दुसरा घेण्याची चिंता. त्यातही शाळा लवकर सुरू झाली, तर ठीक नाहीतर महागडा रिचार्ज केव्हापर्यंत सहन करणार, असा प्रश्न त्यांना उपस्थित झाला आहे.

दुर्गम भाग "नॉट रिचेबल'
तालुक्‍यामध्ये बडेगाव सर्कल हा दुर्गम भाग येथील जंगलाचा परिसर असल्याने या भागातील काही गावांमध्ये मोबाईलवर संपर्कच होऊ शकत नाही, अशी स्थिती असताना व स्मार्टफोनसाठी कव्हरेज नसताना या भागातील विद्यार्थ्यांना हा ऑनलाइन अभ्यासक्रम ऑफलाइन ठरू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will educational "online" activities be "offline"?