"कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणार असाल तर पुरस्कार नको" : साहित्यीक यशवंत मनोहर

Yahwant Manohar refused award of Vidarbh Sahitya Sangh as religious photos in it 
Yahwant Manohar refused award of Vidarbh Sahitya Sangh as religious photos in it 

नागपूर ः विदर्भ साहित्य संघातर्फे यंदाचा जीवनव्रती पुरस्कार प्रख्यात कवी व ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना घोषित करण्यात आला होता. परंतु, कार्यक्रमापूर्वीच त्यांनी नम्रपणे हा पुरस्कार नाकारला. वाङ्‍मयीन कार्यक्रमात धार्मिक प्रतिके ठेवली जाणार असल्याने पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचे विलास मानेकर यांच्यासोबत कार्यक्रमाच्या व्यवस्थेबाबत चर्चा केली होती. सरस्वतीची प्रतिमा असणार का याबाबत विचारणाही करीत ती राहणार असेल तर येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. हा धर्माचा नाही तर साहित्यिकांचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले होते. कार्यक्रमाच्या दिवशी डॉ. मनोहर यांनी त्यांच्या भावना विदर्भ साहित्य संघाचे कार्यकारिणी सदस्य इंद्रजित ओरके यांना कळविली. डॉ. मनोहर यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

काय म्हणाले यशवंत मनोहर 

डॉ. यशवंत मनोहर यांनी पुरस्कार नाकारताना पाठविलेला संदेश असा- डॉ. इंद्रजित ओरकेंनी मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे चौकशी केली, पण तुम्ही कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणारच असं कळलं. मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल असे वाटले होते. पण ते झाले नाही. म्हणून मी नम्रपणे हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणाऱ्या शोषणसत्ताकाची प्रतीके मी पूर्णतः नाकारलीच आहेत. 

माझा सन्मान म्हणजे जिच्या अनन्यतेमुळे मी ओळखला जातो त्या माझ्या जीवनदृष्टीचा सन्मान! माझ्या या जीवनदृष्टीत न बसणारे अनेक पुरस्कार मी नाकारले आहेत. वाङ्मयीन कार्यक्रमात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही. म्हणून आपण मला दिलेला जीवनव्रती हा पुरस्कार मी नम्रपणे नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण मला समजून घ्यावे. मनोहर म्हैसाळकर म्हणजे माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारा माणूस. ते मला निश्चित समजून घेतील ही खात्री मला आहे. आयुष्यभर जपले ते मी कोणत्याही कारणास्तव नाकारू शकत नाही. कारण मी मला नाकारले तर माझ्याशी जगण्यासारखे काहीही नाही. क्षमस्व. डॉ. यशवंत मनोहर.

डॉ. यशवंत मनोहरांनी मोबाईलवर मॅसेज पाठवून त्यांचा मनोदय व्यक्त केला. नम्रपणे पुरस्कार नाकारत असल्याचे त्यांनी कळविले. यापूर्वी त्यांनी कार्यक्रमस्थळी राहणाऱ्या प्रतिकांबाबत विचारणा केली होती. धार्मिक कार्यक्रम नसल्याने प्रतिमा ठेवणार असाल तर साहित्यिकांचा कार्यक्रम असल्याने माडखोलकर आदींच्या प्रतिमा ठेवण्याची सूचना त्यांनी केली होती
-इंद्रजित ओरके, 
कार्यकारिणी सदस्य, विदर्भ साहित्य संघ.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com