किती निर्दयीपणा! एकाच कंटेनगरमध्ये कोंबली ६४ जनावरे, ६ जनावरांचा मृत्यू

संतोष ताकपिरे
Tuesday, 2 March 2021

एच. आर. 55 एस. 8795 क्रमांकाचा कंटेनर हा नागपूरमार्गे अमरावतीवरून अकोलाकडे जात होता. नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी सदर कंटेनर हा बेलोरा गावाजवळ थांबविला. त्याची पाहणी केली असता कंटेनरमध्ये 64 जनावरे होती.

अमरावती : मध्य प्रदेशातून नागपूर, अमरावतीमार्गे अकोलाकडे जाणाऱ्या कंटेनरमध्ये तब्बल 64 जणावरांना कोंबून नेल्या जात असल्याची बाब लोणीनजीक तपासणी करताना पोलिसांच्या निदर्शनात आली. त्यापैकी श्वास गुदमरल्यामुळे सहा जनावरांचा मृत्यू झाला. लोणी ठाण्याच्या हद्दीतील बेलोरा गावाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. 

हेही वाचा - रात्रंदिवस राबून जोपासलं पीक अन् पशूधन, पण एक ठिणगी पडली अन् सर्वच संपलं

एच. आर. 55 एस. 8795 क्रमांकाचा कंटेनर हा नागपूरमार्गे अमरावतीवरून अकोलाकडे जात होता. नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी सदर कंटेनर हा बेलोरा गावाजवळ थांबविला. त्याची पाहणी केली असता कंटेनरमध्ये 64 जनावरे होती. त्यात गाय, बैल, वासरांचा समावेश होता. कंटेनर पूर्ण बंद असल्याने जनावरांचा श्‍वास गुदमरल्याचे दिसून आले. बरीच जनावरे गंभीर जखमी झाली. त्यात सहा जनावरांचा मृत्यू झाला होता. मृत जनावरांची किंमत 84 हजार आहे, तर एकूण गोवंश 9 लाख 60 हजार रुपये, कंटेनर 15 लाख, अशी एकूण 24 लाख 60 हजार रुपयांची सामग्री पोलिसांनी जप्त केली. इकरार अली मुश्‍ताक अली (रा. खाराकुवा, मध्य प्रदेश) व शाकीर अली अनामत अली (वय 40, रा. दाडीयावाडी, जि. राजगढ), अशी अटक दोघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा - शिवसेनेकडे नाहीत फारसे पर्याय; आशीष जयस्वाल नवे वनमंत्री?

शेंदूरजनाघाट पोलिसांनी पहाटे पाचच्या सुमारास दोन पीकअप व्हॅनची तपासणी केली असता, त्यामध्येही 23 गोवंशांना कोंबून वाहतूक केल्या जात असल्याचे निदर्शनात आले. याप्रकरणी दोघांना शेंदूरजनाघाट पोलिसांनी अटक केली व त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 6 cattle died out of 64 which carrying through single container in amravati