स्थायी समितीमधून सभापतींसह आठ सदस्य होणार निवृत्त, लवकरच नव्या शिलेदारांची निवड

सुधीर भारती
Tuesday, 2 February 2021

नव्याने स्थापन होणाऱ्या सोळा सदस्यांच्या स्थायी समितीची या पंचवार्षिकमधील ही अखेरची टर्म राहणार आहे. गतवर्षी स्थापन झालेल्या आठ सदस्यांना निवृत्त करण्यात येणार आहे.

अमरावती : महापालिकेची तिजोरी अर्थात स्थायी समितीसाठी नव्या शिलेदारांची निवड या महिन्यातील आमसभेत करण्यात येणार आहे. स्थायी समितीमधून बाहेर पडणाऱ्यांची नावे निश्‍चित झाली असून त्यामध्ये विद्यमान सभापतींचाही समावेश आहे. नव्या सदस्यांची नावे गटनेते आमसभेत पाठविणार आहेत. मावळत्या समितीचा अधिकाधिक कार्यकाळ कोरोना संक्रमणात गेला.

हेही वाचा - बालकांना पोलिओऐवजी सॅनिटायझर पाजणारे दोघे बडतर्फ,...

नव्याने स्थापन होणाऱ्या सोळा सदस्यांच्या स्थायी समितीची या पंचवार्षिकमधील ही अखेरची टर्म राहणार आहे. गतवर्षी स्थापन झालेल्या आठ सदस्यांना निवृत्त करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यमान सभापती व भाजपचे सदस्य राधा कुरील, विजय वानखडे, राजेश साहू, धीरज हिवसे, नीता राऊत, शिवसेनेचे गटनेते भारत चौधरी, रिपाइं (आ.) प्रकाश बनसोड, बसपच्या सुगराबी भोजा रायलीवाले यांचा समावेश आहे. तर भाजपच्या अनिता राज, पंचफुला चव्हाण, युवा स्वाभिमानच्या सुमती ढोके, काँग्रेसचे प्रदीप हिवसे, सलिम बेग, सुनीता भेले, एमआयएमचे गटनेते अ. नाजीम व शेख इमरान कायम राहणार आहेत.

हेही वाचा - फडणवीसांचा सवाल; ‘अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेले मुलीचे लग्न कसे करू?’, पीएफसाठी...

समिती स्थापन करण्यासाठी नव्या आठ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यातील सहा सदस्य भाजपचे राहणार आहेत. सेना व बसपला एक सदस्य द्यायचा आहे. गतवेळी सत्ताधारी भाजपने मित्रपक्ष रिपाइं व युवा स्वाभिमानला समितीत सदस्यत्व दिले आहे. त्यांची टर्म संपली आहे. यावेळी मित्रपक्षांपेक्षा स्वपक्षातील सदस्यांचा विचार करण्याची खेळी भाजपकडून निवडणुकीच्या तोंडावर केली जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे स्थायी समितीत या पक्षाकडून सहाही सदस्य पक्षीय राहण्याची शक्‍यता अधिक आहे. गटनेते या महिन्यातील आमसभेत नव्या सदस्याच्या नावांची शिफारस महापौरांकडे करणार आहेत.

हेही वाचा - चुलीत भस्मसात झाले मरणाचे भय; सरपणासाठी जीव धोक्‍यात,...

मुदतवाढीची इच्छा -
विद्यमान सभापती राधा कुरील निवृत्त होत आहेत. त्यांचा सभापतिपदाचा अधिकाधिक कार्यकाळ कोरोना संक्रमणात गेला. काम करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी तसेच कामकाजाचा ठप्पा उमटवू शकतील, असे निर्णय करण्याची संधी त्यांना मिळू शकली नाही. त्यामुळे मुदतवाढ मिळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, स्थायी समितीला मुदतवाढ देण्याची तरतूद नसल्याने त्यांना निवृत्त होण्याची वेळ आली आहे. दरम्यान, पक्षातून चार वर्षे पदरात कोणतेच पद न मिळालेल्या दोन महिला सदस्यांचा विचार पक्षात सुरू आहे. त्यामध्ये स्वाती कुळकर्णी व रीता पडोळे यांचा समावेश आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 members retire from standing committee in amravati municipal corporation