अकोला जिल्ह्यात दीड दिवसाआड शेतकरी आत्महत्या

अनुप ताले 
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

सप्टेंबरमध्ये १९ शेतकऱ्यांनी त्यागले प्राण; २०१७ मध्ये १३१ आत्महत्या

अकोला : तीन वर्षापूर्वीपर्यंत दुष्काळ, नापिकीमुळे घटलेले उत्पादन शेतकऱ्यांची समस्या बनली होती. परंतु, गतवर्षीपासून शेतमालाला उत्पादन खर्च निघेल एवढासुद्धा भाव मिळत नसल्याने, शेतकऱ्यांची आर्थिक कोडी झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून, जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. सप्टेंबरमध्ये एकूण १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, आर्थिक कोंडीमुळे दहा महिन्यांत १३१ शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. ही आकडेवारी बघता दर दीड दिवसाआड एक शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे स्पष्ट होते.

देशाचा पोशिंदा किंवा अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची गत
काही वर्षांपासून दैना झाली आहे. आतापर्यंत नैसर्गिक संकटांशी दोन हात करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांना, शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे दिवसरात्र शेतात घाम गाळूनही ते शक्य होत नाही.

शेतमालाला भाव किंवा बाजारपेठच मिळत नसल्याने, काबाडकष्ट करून उगवलेले धान्य मातीमोल दरात विकावे लागत आहे किंवा योग्य दराच्या प्रतीक्षेत पाणी पावसात भिजून जागेवरच नष्ट होत आहे. त्यामुळे शेतकरी नैराश्यग्रस्त होऊन ते आत्महत्येकडे वळत आहेत. गत काही वर्षांपासूनच्या किंवा वर्षभरातील शेतकरी आत्महत्यांची संख्या लक्षात घेता, जिल्ह्याची ओळखच शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून व्हायला लागली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: akola marathi news a farmer commits suicide every alternate day