उच्च शिक्षण घेणार, तेव्हा जाणून घ्या तुम्ही निवडलेल्या विद्यापीठाचे मानांकन!

amaravati univarsity
amaravati univarsity

अकोला : कोरोना विषाणू कोविड-19 मुळे देशभर असलेल्या लॉकडाउनने दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल लांबणीवर पडणार आहे. असे असेल तरी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पुढील शिक्षणासाठी कुठे प्रवेश घ्यावा, याचा विचार आतापासूनच सुरू केला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी देशभरातील 877 विद्यापीठांमध्ये तो निवडत असलेले विद्यापीठ कोणत्या स्तराचे आहे, हे जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेकडून देण्यात आलेले मानांकन सहायक ठरणार आहे. या मानांकनात विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठापेक्षा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सरस ठरले आहे.


विद्यापीठातील शिक्षण, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, विद्यापीठाची परीक्षा पद्धत, निकाल, ऑनलाइन कामकाज, विद्यापीठाचे संकेत स्थळ किती अपटेड आहे या आणि इतर काही गुणवत्ता निकषांच्या आधारावर दर महिन्याला विद्यापीठांकडूनच प्राप्त अहवालानुसार त्या-त्या विद्यापीठांचे मानांकन ठरविले जाते. त्यासाठी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे मुख्यालय असलेली इंटरनॅशनल हायर एज्युकेनश डिरेक्टरी ही ‘युएनआय रॅंक’ संस्था वर्षभर काम करते. या संस्थेने विद्यापीठाला दिलेल्या मानांकनाचा आधार घेवूनच जगभरातील विद्यार्थी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी विद्यापीठांची व महाविद्यालयांची निवड करतात. भारतातील 877 विद्यापीठांचे मानांकन ही संस्था ठरविते. त्यानुसार 2020 मधिल पहिल्या सहा महिन्यांसाठीचा अहवालानुसार मानांकन जाहीर करण्यात आले आहे. हे मानांकन बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा ठरविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.


महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्येच गुणवत्तेत फरक
महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या गुणवत्तेत मोठा फरक असल्याचे युएनआय रॅंकने जाहीर केलेल्या मानांकनावरून दिसून येते. या मानांकन यादीत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पहिल्या दहा मानांकित विद्यापीठांमध्ये आहे. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचा 25 वा क्रमांक लागतो. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 100 तर उत्तर महारष्ट्र विद्यापीठ जळगाव 155 आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड 201 व्या स्थानावर आहे. विदर्भातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मानांकन 178 वे असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला 223 वे मानांकन आहे. गोंडवाणा विद्यापीठ गडचिरोलीला 505 वे मानांकन आहे. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाला या यादीत 475 वे तर वंसतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीला 533 वे मानांकन आहे.


कसे ठरविले जाते मानांकन?
युएनआय रँक ही संस्था त्यांच्या संकेत स्थळावर दरवर्षी जानेवारी आणि जूनमध्ये जगभरातील विद्यापीठांचे मानांकन जाहीर करते. पदवी, पदव्युत्तर आणी डॉक्टरेट अभ्यासक्रम चालविणाऱ्या विद्यापीठांचे व संलग्न संस्थांच्या शैक्षणिक व सुविधांच्या आधारावर जे विद्यापीठाकडूनच सादर केले जाते, त्यावर मानांकन निश्‍चित केले जाते. जगभरातील 200 देशातील 13 हजार 600 विद्यापीठांचे मानांकन ही संस्था जाहीर करीत असल्याची माहिती शिक्षण तज्ज्ञ डॉ. संजय खडक्कार यांनी दिली. भारतातील 877 विद्यापीठांचे मानांकनही ही संस्था निश्‍चित करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com