खबरदार! प्रतिबंधित क्षेत्रातून कुणीही बाहेर पडू नये

contentment jhon.jpg
contentment jhon.jpg

मूर्तिजापूर (जि. अकोला) : प्रतिबंधित क्षेत्रातून कुणीही आत बाहेर करणार नाही, याबाबत दक्ष राहाण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी येथील प्रशासनाला दिले. कोरोनाच्या प्रवेशाचे गालबोट लागलेल्या या शहरातील प्रतिबंधित क्षेत्र, कोविड केयर सेंटर व उपजिल्हा रूग्णालयास भेट दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्याकडून त्यांनी सविस्तर माहिती घेतली. या शहरात कोरोनाची एंट्री झाल्यानंतर लगेच कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा शोध घेण्यास सरसावलेल्या यंत्रणेने 20 जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले.

69 जणांना केले होम क्वारंटाईन
मृतकाच्या संपर्कात आलेल्यांपैकी दोन दिवस शोधण्यात आलेल्या व जास्त जोखिम असणाऱ्या 54 नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हेंडजच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतीगृहाच्या इमारतीतील कोविड केयर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. एक डॉक्टर व दोन्ही रुग्णालयांमधील स्टाफचाही त्यात समावेश आहे. त्यांचे सर्वांचे स्वॕबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. एक खासगी डॉक्टर त्यांच्या रुग्णालयातच विलगीकृत आहेत. कमी जोखिम असणाऱ्या 69 नागरिकांना घरातच राहाण्यास (होम क्वारंटाईन) सांगण्यात आले आहे.

बुधवारी झाला पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू
येथील जुन्या शहरातील एका माजी नगरसेवकाला, उच्च रक्तदाबाचा उपचार करीत असलेल्या येथील दोन खासगी डॉक्टरांनी अकोल्याला जाण्याचा सल्ला दिला होता. अकोल्याच्या सर्वोपचार रूग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी (ता.13) त्याचा मृत्यू झाल्यानंतर लगेच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कारही उरकण्यात आले. असंख्य लोकांची अंत्यसंस्काराला उपस्थिती होती. आणि शनिवारी रात्री सदर इसम कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर लगेच यंत्रणा कामाला लागून संपूर्ण जुनी वस्ती सील करून मृतकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास सुरूवात झाली होती.

नागरिकांनी सावध होऊन स्वतःची काळजी घ्यावी
मृतकाच्या संपर्कात आलेल्या 123 पैकी हायरिस्क असणाऱ्या 54 लोकांचे स्वॕब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दोन दिवसात आहवाल येईल. नंतरच चित्र स्पष्ट होईल. नागरिकांनी घाबरून न जाता सावध होऊन स्वतःची काळजी घ्यावी.
-अभयसिंह मोहिते, उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com