esakal | या आजाराने सुद्धा केली विदर्भात एन्ट्री अन् शेतकरी झाले हैराण 
sakal

बोलून बातमी शोधा

Pashudhan

शेळ्या मेंढ्यातील देवी विषाणूशी साधर्म्य आढळून येत असले तरी हा आजार शेळ्या, मेंढ्यांना होत नाही. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, झरी जामनी, मारेगाव, राळेगाव, उमरखेड, पांढरकवडा आदी प्रत्येक तालुक्‍यात दोनशे ते तीनशे गाय, बैल, वासरू यांच्यावर लम्पिने आक्रमण केले आहे.

या आजाराने सुद्धा केली विदर्भात एन्ट्री अन् शेतकरी झाले हैराण 

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : जिल्ह्यातील गाय, बैल आणि वासरू या पशुधनावर ‘लम्पि’ या त्वचेच्या आजाराने आक्रमण केले आहे. पशुधनाच्या अंगावर गाठी दिसून येत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. यात मृत्यूदर कमी असला तरी शेतकऱ्यांवर नवीन संकट घोंगावत आहे. यूपी, बिहार, मराठवड्यातून विदर्भात लम्पिची एन्ट्री झाल्याची माहिती पशुचिकित्सकांनी दिली आहे. 

कोरोना आणि खरीप हंगामात दुबार पेरणी करावी लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यातच पशुधनावर लम्पिचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. लम्पिची बाधा आढळल्यास तत्काळ उपचार करण्याचा सल्ला पशुचिकित्सकांकडून देण्यात येत आहे. हा आजार देवी विषाणू गटातील कॅप्रीपॉक्‍स या विषाणूमुळे होतो. चावणाऱ्या माशा, डास, गोचीड आदींद्वारे हा आजार एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरास होतो.

शेळ्या मेंढ्यातील देवी विषाणूशी साधर्म्य आढळून येत असले तरी हा आजार शेळ्या, मेंढ्यांना होत नाही. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, झरी जामनी, मारेगाव, राळेगाव, उमरखेड, पांढरकवडा आदी प्रत्येक तालुक्‍यात दोनशे ते तीनशे गाय, बैल, वासरू यांच्यावर लम्पिने आक्रमण केले आहे. विदर्भात या आजाराची एन्ट्री होण्यापूर्वी मराठवाड्यात आढळून आला होता. पशुधनाच्या आयातीमुळे यूपी, बिहारमधून मराठवाडा आणि नंतर विदर्भात आजार पाय पसरत आहे. 
 
संकरित जनावरांना धोका 

देशी वंशाच्या जनावरांपेक्षा संकरित जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्‍यता जास्त असते. परंतु मानवास जनावरांपासून हा आजार होत नाही. या आजाराचा संसर्ग होण्याचे प्रमाण हे साधारणतः १० ते २० टक्‍के असून मृत्यूदर अतिशय नगण्य आहे. 


हेही वाचा - घरातील कुटूंब साखरझोपेत असतानाच अचानक आभाळ कोसळले अन्… वाचा पुढे 
 

आजाराची प्रमुख लक्षणे 

या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे सुरुवातीस दोन ते तीन दिवस जनावरास बारीक ताप जाणवतो. नंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारपणे पाठ, पोट, पाय व जननेंद्रिय आदी भागात येतात. बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठीमुळे जनावरे लंगडतात, काही अंशी श्वसन संस्थेची लक्षणे आढळतात. 

जाणून घ्या - त्या तिघांनी थांबवली अधिकाऱ्याची कार.. अन सुरू झाला प्रकार 'बँड बाजा बारात' .. नक्की काय घडले.. वाचा
 

या आजाराबाबत पशुपालकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जाऊ नये. योग्य उपचाराने जनावरे बरी होतात. आजाराची लक्षणे जनावरांत आढळल्यास त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत. तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सूचना देण्यात आल्या आहे. 
-डॉ. राजीव खेरडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, यवतमाळ 

संपादन ः राजेंद्र मारोटकर 

loading image
go to top