भाजपने अधिकाऱ्यांना दिली झुणका भाकर भेट; अमरावती जिल्हाकचेरीत केले आंदोलन 

संतोष ताकपिरे
Saturday, 14 November 2020

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळेवर मदत न देता राज्य शासनाने त्यांची थट्टा चालविली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

अमरावती ः अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने द्यावी. या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वत: झुणका भाकरीचा आस्वाद घेतला, शिवाय एक झुणका भाकर अपर जिल्हाधिकारी राम सिद्धभट्टी यांना भेट दिली.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळेवर मदत न देता राज्य शासनाने त्यांची थट्टा चालविली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांची नावेही मदतीच्या यादीत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची यावर्षीची दिवाळी अंधारातच असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. 

माजी पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यासह प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. शेतकऱ्यांसाठी एकप्रकारे ही काळी दिवाळी असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट एकरी पंचवीस हजार तर बागायतीला हेक्‍टर पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी. एमएसपी कायद्यानुसार अठरा प्रकारच्या भरड धान्यांची, कापसाची दिवाळीतही खरेदी सुरू ठेवावी. 

सविस्तर वाचा - नागरिकांनो फटाके फक्त दोनच तास वाजवा, अन्यथा होणार कारवाई 

सरसकट कर्जमाफी, संत्रा, केळी व इतर फळबागांच्या विम्याचे बदललेले निकष त्वरित रद्द करून जुने निकष कायम ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. किसन क्रेडिट कार्डची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही भाजप पदाधिकाऱ्यांनी रेटून धरली. यावेळी जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी, प्रा. रवींद्र खांडेकर, जयंत डेहणकर, मिलिंद बांबल, राजेश गोफणे, यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.     

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP gave Zunka bhakar to officers while protest