esakal | शाळेत टाकले म्हणून डोकं फोडणारी अंध सुरेखा झाली लिपिक
sakal

बोलून बातमी शोधा

शाळेत टाकले म्हणून डोकं फोडणारी अंध सुरेखा झाली लिपिक

शाळेत टाकले म्हणून डोकं फोडणारी अंध सुरेखा झाली लिपिक

sakal_logo
By
शशिकांत जामगडे

पुसद (जि. यवतमाळ) : आयुष्यात काही जणांना अनेक अडथळे पार करीत जीवन जगावे लागते. असेच वेगळ्या वाटेने जाणारे संघर्ष जीवनासंबंधी नवी आशा निर्माण करून जातात. पुसद लगतच्या वालतूर रेल्वे या गावातील शेतमजूर कुटुंबातील अंध सुरेखाने शिक्षणाच्या जोरावर बँकेत नोकरी मिळवून अंध:कारातून जीवनप्रकाश शोधला आहे. बँक ऑफ इंडिया शाखा डी.एन.रोड, मुंबई येथे लिपिक म्हणून काम करणाऱ्या दिव्यांग सुरेखा आशा गजानन पवार या तरुणीची संघर्षगाथाही यापैकी एक आहे.

सुरेखा ही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतील कुटुंबातील. जन्मत:च दृष्टी हरवलेली. जगात आल्यापासून तिच्यासमोर केवळ अंधार होता. सुरेखा सात वर्षांची असताना प्राथमिक शिक्षणासाठी पोफाळी ता. उमरखेड येथील अंध विद्यालयात दाखल केले. तिने शाळेत का टाकले म्हणून दगडावर डोके आपटून फोडले होते. परंतु, उत्कृष्ट व कर्तव्यनिष्ठ शिक्षकांनी तिला आपलेसे करून ज्ञानार्जनाचे धडे दिले.

हेही वाचा: आरोग्यासाठी नागरिकांनी केले मुंडण; ओव्हरलोड वाहतुकीमुळे त्रस्त

हळूहळू मन रमल्यानंतर तिने मागे वळून न पाहता तिथेच सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण आळंदी येथील जागृती अंध विद्यालयात पूर्ण केले. पोफाळी येथील सामान्य विद्यार्थ्यांसाठी असलेल्या श्री शिवाजी विद्यालयातील कला शाखेतून बारावीचे शिक्षण घेऊन तिने यश संपादन केले. त्यानंतर मुंबई येथील शासकीय वसतिगृहात राहून कीर्ती काॅलेज मधून बी.ए.ही पदवी मिळवली. मुंबई विद्यापीठातून एम.ए. ही पदव्युत्तर पदवी घेतली.

पदव्युत्तर शिक्षण सुरू असतानाच २०१६ पासून तिने ‘आयबीपीएस’ या बँकिंगच्या परीक्षेसाठी व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूलमध्ये क्लासेस लावले. सतत पाच वर्षे ती अपयशाचा सामना करीत होती. २०१८ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्याने वसतिगृह सोडावे लागले. अशाही परिस्थितीत हार न मानता तिने काही दिवस मैत्रिणीकडे राहून तर काही दिवस पालकांसोबत राहून तीन वर्षांच्या कठोर मेहनतीने बँकिंग परीक्षेत यश संपादन केले.

संघर्षातून मिळते जगण्यासाठी प्रेरणा

जिद्द, चिकाटी व कठोर मेहनतीच्या जोरावर तिने आयुष्यातील अंधारावर विजय मिळवला. आपला प्रकाश तिने स्वत: निर्माण केला. बँकेमध्ये अधिकारी व्हायचे असल्याने हा संघर्ष सुरूच आहे. तीही त्याला जिद्दीने सामोरे जात आहे. कष्टाशिवाय काहीही मोठे नाही, हेच तिचा संघर्ष सांगतो. दृष्टी असणाऱ्यांनाही सुरेखाच्या संघर्षातून जगण्यासाठी प्रेरणा मिळते.

हेही वाचा: दोघांचे मृतदेह वर्धा नदीपात्रात आढळले तरंगताना

स्वत: करते सर्व काम

नोकरी करताना घरातही ती इतर मुलींप्रमाणे स्वत: सर्व कामे करते. विशेष म्हणजे दिव्यांग असलेल्या दोन मैत्रिणींसह कार्यालयापासून दूर असलेल्या बदलापूर येथे फ्लॅटमध्ये राहून दररोज स्वत:च्या स्वयंपाकासह सर्वच कामे करण्याबरोबरच दररोज लोकलने सत्तर किलोमीटर जाणे व सत्तर किलोमीटर परत रेल्वेने प्रवास करून स्वावलंबित्वाचे जीवन जगत आहे. या सर्व संघर्षात सुरेखाला कुटुंबीयांचा मोठा आधार मिळतो, असेही तिने सांगितले.

loading image
go to top