esakal | शेतकऱ्यांच्या वेदनांचा अंत बघणारा प्रसंग; दीडशे क्विंटल धान जळून खाक, तीन पुंजणे जाळले
sakal

बोलून बातमी शोधा

Burn one and a half quintals of paddy in Chandrapur district

अगदी काही दिवसांत हाती येणार पिकाला अज्ञाताने आग लावून जाळल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. सतत चार महिन्यांची मेहनत उभ्या डोळ्यांनी जळताना बघून धोडरे कुटुंबीयांसह गावकऱ्यांतही दुखाचे सावट पसरले होते.

शेतकऱ्यांच्या वेदनांचा अंत बघणारा प्रसंग; दीडशे क्विंटल धान जळून खाक, तीन पुंजणे जाळले

sakal_logo
By
संदीप रायपूरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : यंदा धानाचे चांगल पीक झाले. धानकापणी पार पडली. साधारणतः सात एकर शेतात दीडशे क्विटंल धानाचे उत्पन्न होणार असल्याने ते समाधानी होते. चार महिने केलेल्या मेहनतीचे फळ अवघ्या काही दिवसांत हातात येणार असताना अज्ञाताने डाव साधला. शेतात असलेले धानाच्या तीन पुंजण्याला आग लावली आणि होत्याच नव्हत झाले. आपल्या मेहनतीच्या फळाला डोळ्यासमोर जळून खाक होताना बघून शेतकरी कुटुंब पुरत ढवळून निघाल.

गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर येथे काली रात्रीच्या सुमारास शेतकरी बांधवाच्या वेदनांचा अंत बघणारा हा कठोर प्रसंग घडला. आक्सापूर येथील रूषी नारायण धोडरे यांच्याकडे सात एकर शेती आहे. शेतात ते धानपीक घेतात. यावर्षी त्यांनी प्रचंड परिश्रम घेत सात एकर शेतात धानपीक रोवले. निसर्गाने साथ दिल्याने समाधानकारक पीक निघाले. नुकतीच त्यांनी धानकापणी केली. तीन धानाचे पुंजणे शेतात ठेवले.

अधिक वाचा - पदवीधर मतदारसंघ निवडणूक: रिंगणात होते दोन अभिजीत वंजारी; पात्र ठरले एकच

काल रात्री धोडरे आपल्या कुटुंबासोबत घरी होते. यावेळी गावातील नागरिकांना शेतात आग लागल्याचे लक्षात आले. काही वेळातच ही माहिती गावभर पकरली आणि एकच खळबळ माजली. आपल्या शेतातील धानाच्या पुंजण्याला आग लागल्याची माहिती मिळताच रूषी धोडरे व कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती तहसीलदार के. डी. मेश्राम, कोठारीचे ठाणेदार तुषार चव्हाण यांना देण्यात आली. तहसीलदार, ठाणेदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बल्लारपूरवरून अग्नीशामक दलाचे वाहन बोलविण्यात आले. यावेळी दलाच्या जवानांनी आग विझविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण धानाचे पुंजणे पूर्णपणे जळून खाक झाले होते.

परिसराची पहाणी केल्यानंतर तिन्ही पुंजण्यांना स्वंतंत्रपणे आग लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणाची तक्रार रूषी धोडरे यांनी केली आहे. घटनेचा तपास ठाणेदार तुषार चव्हाण करीत आहेत. रूषी धोडरे यांना सात एकर शेतातून साधारणत दीडशे क्विंटल धानपिक निघणार होते. याची किंमत साधारणत तीन लाख रूपये एवढी होती.

क्लिक करा - अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार

अगदी काही दिवसांत हाती येणार पिकाला अज्ञाताने आग लावून जाळल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. सतत चार महिन्यांची मेहनत उभ्या डोळ्यांनी जळताना बघून धोडरे कुटुंबीयांसह गावकऱ्यांतही दुखाचे सावट पसरले होते.

प्रशासन सरसावले

आक्सापुरातील शेतकऱ्यायाचे धानाचे पुुंजणे जाळल्याची माहिती कळताच गोेंडपिपरीचे तहसीलदार के. डी. मेश्राम, कोठारीचे ठाणेदार तुषार चव्हाण हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. बल्लारपूरवरून तातडीन अग्निशामकाचे वाहन बोलविण्यात आले. पहाटेपर्यंत प्रशासनाची चमू घटनास्थळी ठाण मांडून होती. आग विझविण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. परंतु, या आगीत शेतकऱ्‍याचे पुरते पीक जळून खाक झाले. आग कुणी लावली याचा तपास करणार असल्याची माहिती ठाणेदार चव्हाण यांनी दिली.

अधिक माहितीसाठी - बालविवाह झालेल्या वृद्ध दाम्पत्याचा पुनर्विवाह; मोठा मुलगा वडिलांचा, तर लहान मुलगा आईचा पालक

गोंडपिपरीसाठी दुःखद दिवाळी

गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी दुखद दिवाळी गेली. तालुक्यातील गोजोली येथील शेतकऱ्याचा विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने मृत्यू झाला. तर नांदगावातील एका शेतकऱ्याने कंटाळून आपली जिवनयात्रा संपविली. काल एकाने शेतकऱ्याचे धानपुंजणे जाळून टाकले.

संपादन - नीलेश डाखोरे