कापूस खरेदीचे शासकीय केंद्र सुरू, पण प्रत घसरल्याने शेतकऱ्यांचे वांदे

कृष्णा लोखंडे
Monday, 30 November 2020

अमरावती जिल्ह्यात अमरावती, दर्यापूर, मोर्शी व वरूड येथील केंद्र सुरू झाले असून अचलपूर येथील केंद्र 1 डिसेंबरला सुरू होण्याची शक्‍यता आहे. कापसाच्या शासकीय खरेदीस सुरुवात झाली आहे.

अमरावती :  बोंडअळी व बोंडसडच्या आक्रमणाने कापसाच्या उत्पादनात घट येण्यासोबतच प्रत घसरली आहे. त्यामुळे यंदा एफएक्‍यू दर्जाचा कापूस तुलनेने कमी मिळण्याची शक्‍यता असून सीसीआयने एफएक्‍यू एलआरए, असा दर्जा ठेवून खरेदी केल्यास शेतकऱ्यांना पैसे मिळू शकणार आहेत. अन्यथा खासगी बाजारपेठेत हमीदरापेक्षा किमान एक हजार रुपये कमी दराने कापूस विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. 

हेही वाचा - Big breaking : बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

दरम्यान, अमरावती जिल्ह्यात अमरावती, दर्यापूर, मोर्शी व वरूड येथील केंद्र सुरू झाले असून अचलपूर येथील केंद्र 1 डिसेंबरला सुरू होण्याची शक्‍यता आहे. कापसाच्या शासकीय खरेदीस सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पाच शासकीय केंद्र असून अमरावती व दर्यापूर केंद्रावर आठशे क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या छायेत राजकीय पुढाऱ्यांशिवाय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कापूस खरेदीचा श्रीगणेशा करण्यात आला. यंदा पावसामुळे व बोंडअळीच्या आक्रमणामुळे कापसाची उत्पादकता व प्रत प्रभावित झाली आहे. शासकीय केंद्रांवर चांगल्या प्रतीचाच कापूस खरेदी करण्यात येत असल्याने दुय्यम दर्जाच्या कापसाच्या विक्रीची अडचण निर्माण झाली आहे.

हेही वाचा - बाबा आमटेंची नात ते महारोगी सेवा समितीच्या सीईओ, डॉ. शीतल आमटेंचा जीवनप्रवास

अमरावती येथील केंद्र कामुंजा येथील शेतकरी सहकारी जिनिंग अँण्ड प्रेसींगमध्ये तर, दर्यापूरच्या सदगुरू जिनिंग अँण्ड प्रेसिंगमध्ये बाजार समिती व पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कापूस खरेदीस सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी अमरावती येथील केंद्रावर 125 क्विंटल कापसाची खरेदी झाली. अमरावती व दर्यापूर या दोन केंद्रांवर 27 वाहनांतून 800 क्विंटल कापूस विक्रीकरिता आला होता. मोर्शी व वरूड येथील केंद्रही सुरू झाली असून अचलपूर येथील केंद्र 1 डिसेंबरला सुरू होणार आहे. कापसाला 5 हजार 725 रुपये हमी भाव देण्यात येत आहे. 

हेही वाचा - 'War and Peace' : आत्महत्येच्या काही तासांपूर्वी डॉ. शीतल आमटेंचे ट्विट; नेमके काय...

यंदा गतवर्षीच्या तुलनेत कापसाचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. बोंडअळी व बोंडसडमुळे कापसाच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम झाला आहे. प्रतवारीतही घट आली आहे. त्यामुळे एफएक्‍यू दर्जाच्या कापसाची उपलब्धता कमी राहणार असल्याचे खरेदीदारांचा अंदाज आहे. उतारा कमी मिळण्याची शक्‍यता असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पैसा कमी पडण्याची शक्‍यता आहे. शासकीय केंद्रांवर सीसीआय एफएक्‍यू दर्जाचाच कापूस घेत असल्याने शेतकऱ्यांना खासगीचा रस्ता धरावा लागणार आहे. कमी प्रतीच्या कापसाला खासगीत 4300 रुपयांपासून भाव मिळण्याचा अंदाज आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cotton selling government center starts in amravati