तिरोडी रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणास वेग; मध्य भारतातून जाणारा महत्वपूर्ण मार्ग

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 26 October 2020

सातपुडा पर्वतरांगात ब्रिटिशांनी मॅगनिज वाहतुकीसाठी तुमसर-तिरोडी दरम्यान 42 किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केला होता. 1928 मध्ये या मार्गाचे काम पूर्ण झाले होते.

तुमसर (जि. भंडारा) : तुमसर रोड ते तिरोडी या ब्रिटिशकालीन रेल्वे मार्गाचे भाग्य उजळत असून या मार्गावर विद्युतीकरणाला वेग आला आहे. 2021 पर्यंत या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. मध्य भारताला जोडणारा हा महत्वपूर्ण रेल्वे मार्ग आहे.

सातपुडा पर्वतरांगात ब्रिटिशांनी मॅगनिज वाहतुकीसाठी तुमसर-तिरोडी दरम्यान 42 किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केला होता. 1928 मध्ये या मार्गाचे काम पूर्ण झाले होते. सध्या तिरोडी-कटंगी या 12 किमी रेल्वेमार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. मध्य प्रदेशातील तिरोडी हे शेवटचे रेल्वेस्थानक आहे. 

तुम्ही रात्री घरात येणाऱ्या हिरव्या किड्यांनी त्रस्त आहात; मग ही बातमी तुमच्यसाठीच

तुमसर-तिरोडी-कटंगी आणि बालाघाट असा हा रेल्वेमार्ग अस्तित्वात येणार आहे. पुढे तो जबलपूरला जोडला जाणार आहे. मध्य प्रदेशात जाण्यास वेळेची बचत करणारा हा महत्वाचा मार्ग ठरणार आहे. यापूर्वी कोळसा व त्यानंतर डिझेल इंजिनवर रेल्वे धावत होती. पुढील काळात येथे विजेचे इंजिन धावणार आहे.

ब्रिटिशांनी चिखला, डोंगरी व मध्य प्रदेशातील तिरोडी खाणीचा शोध लावला. मॅग्निजची उचल करून वाहतुकीसाठी या मार्गावर रेल्वे ट्रॅक तयार केले. काही ठिकाणी दगड फोडून रेल्वे मार्ग तयार केला आहे. या मार्गावर आठ लहान मोठे रेल्वे स्थानक आहेत. त्यात तुमसर टाऊन, गोबरवाही, डोंगरी, तिरोडी हे प्रमुख मोठे स्थानक आहेत. परंतु, काही रेल्वे स्थानक वगळता इतर ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. दिवसातून चार वेळा प्रवासी रेल्वेगाडी या मार्गावर धावते.

बापरे बाप! .चोरट्यांनी केला चक्क वाइनशॉपीत डान्स; असे काय दिसले झाला इतका आनंद

आर्थिकदृष्ट्या मजबूत

तिरोडी - कटंगी रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यानंतर आणि विद्युतीकरण झाल्यावर मध्य प्रदेशासोबत आर्थिक व व्यावसायिक संबंध निर्माण होण्यास मदत होईल. नागपूर, जबलपूर असा थेट रेल्वेमार्ग तयार होणार असून तुमसर तालुक्‍यातील प्रवाशांना याचा फायदा होईल.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electrification work of tirodi railway route is going on