इर्विन रुग्णालयात दलालांचा सुळसुळाट, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पैसे घेतल्याच्या कारणावरून राडा

संतोष ताकपिरे
Tuesday, 20 October 2020

जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रशासकीय कामात खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप होणे ही गंभीर बाब आहे. वास्तविक पाहता दिव्यांग व्यक्तीची अधिकृत तपासणी झाल्यानंतर काही दिवसांनी आवश्‍यक त्या टक्केवारीनुसार प्रमाणपत्र दिले जाते.

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अंतर्गत कामात बाह्य व्यक्तींचा हस्तक्षेप ही काही नवीन बाब नाही. अत्यावश्‍यक प्रमाणपत्रासाठी पैसे घेऊनही काम न झाल्यामुळे पैसे घेणाऱ्या व्यक्ती व देणाऱ्याचे समर्थक आपआपसांत भिडले. सोमवारी (ता. 19) दुपारी एक ते दीडच्या सुमारास ही घटना घडली. बाहेरच्या व्यक्तीसोबत काही लोकांची झटापट झाली, याला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्‍यामसुंदर निकम यांनी दुजोरा दिला.  

हेही वाचा - जिल्हा परिषदांमध्ये आता "एफएमएस' प्रणाली; ग्रामविकास विभागाने घेतला निर्णय 

एका दिव्यांग व्यक्तीने इर्विनमध्ये सतत वावरत असलेल्या एका व्यक्तीला प्रमाणपत्रासाठी आधी काही रक्कम दिली होती. पैसे घेणाऱ्याने पुन्हा त्या दिव्यांग व्यक्तीला पैसे मागितले. आधीचे पैसे देऊनही जिल्हा सामान्य रुग्णालयातून दिव्यांग व्यक्तीला प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे त्याने ज्याला पैसे दिले होते, त्याला काम होत नसल्याने दिलेले पैसे परत मागितले. त्यावरून दिव्यांग व्यक्तीचे समर्थक व प्रमाणपत्रासाठी पैसे घेणारे एजंट यांच्यात आधी शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर झटापट झाली. येथील सुरक्षारक्षकाने संबंधित व्यक्तीला आवरले. घेतलेल्या पैशातील काही वाटा हा एजंटमार्फत येथील काही लोकांपर्यंत पोहोचविला जातो. बाहेरच्या व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीकडून प्रमाणपत्राच्या नावाखाली पैसे घेतल्याची तक्रार आपल्याकडे आली. त्यानंतर संबंधितावर आवश्‍यक ती कारवाई करावी, याबाबत पोलिसांना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासनाकडून कळविण्यात आले. 

हेही वाचा - काय आहे इकॉर्निया वनस्पती? कशी करते भूगर्भातील पाण्याची पातळी कमी?

जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रशासकीय कामात खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप होणे ही गंभीर बाब आहे. वास्तविक पाहता दिव्यांग व्यक्तीची अधिकृत तपासणी झाल्यानंतर काही दिवसांनी आवश्‍यक त्या टक्केवारीनुसार प्रमाणपत्र दिले जाते. दिव्यांगत्वाची जेवढी टक्केवारी असेल, त्यानुसार त्या व्यक्तीला शासकीय व्यवस्थेत नोकरीसह शासकीय सुविधा दिल्या जातात. त्यामुळे असे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी गरजू जिल्हा सामान्य रुग्णालयात येतात. भोळ्याभाबड्यांना पद्धत माहिती नसल्याने येथील बाहेरचे एजंट त्यांना हेरून आमिष दाखवितात. 

झटापट करणाऱ्यांना इर्विनच्या कर्मचाऱ्यांनी आवरले.  नागरिकांना कुणी पैसे मागत असेल तर त्याची तक्रार करावी. ज्याने पैसे मागितले ते इर्विनचे कर्मचारी नसून बाहेरची व्यक्ती असावी. असे प्रकार घडू नये म्हणून योग्य दक्षता घेतली जाईल.
-डॉ. श्‍यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: external agent active in amravati district hospital