चार जणांच्या कुटुंबात एक मुलगा, मुलगी गतिमंद अन्‌ आई वृद्ध मग केले हे...

Family eat food lying on the road at chandrapur district
Family eat food lying on the road at chandrapur district

चिमूर (जि. चंद्रपूर) : लॉकडाऊनमुळे गरीब, मजुरांचे जगणे बिकट झाले आहे. हाताला काम नाही व पैसाही नाही. घरात अन्नाचा कणही नाही. अशा परिस्थितीत लोक दिवस ढकलत आहेत. मात्र, भूकच ती... असह्य झाले की, माणसाला उकीरड्यावरचे अन्नही कमी पडते. काळजाला चिरे पाडणारी अशीच घटना चिमूर तालुक्‍यातील भिसी येथील घडली. दोन दिवसांपासून उपाशी असलेल्या कुटुंबाने शेजाऱ्याने फेकलले अन्न खाऊन आपली भूक भागवली. सुन्न करणारा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी काही युवक पुढे आले आहेत. 

कोरोणा विषाणूच्या संसर्गाने जगभर महामारी पसरली आहे. भारतामध्येही याचे रुग्ण व मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फटका गरीब, मजूर व शेतकऱ्यांना बसला आहे. भिसी येथे वॉर्ड क्रमांक तीनमध्ये अनुसया माट्टेटवार (वय 70) ही महिला, दोन मुले व एका मुलीसोबत झोपडीत राहते. या वृद्धेचा एक मुलगा, एक मुलगी गतिमंद आहे. ते कोणतेही काम करीत नाही. दुसरा मुलगा हॉटेलमध्ये काम करतो. त्याच्यावरच कुटुंबाची उर्वरित तिघांची जबाबदारी आहे. 

लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहेत. त्यामुळे या मुलाच्या हातचेही काम गेले. गावात बहुतेक शेतकरी कुटुंबातील. हातावर आणून पानावर खाणारे. त्यांच्या जगण्याचा प्रश्‍न असताना माट्टेवार कुटुंबीयांना मदत कोण करणार? लॉकडाऊननंतर घरात थोडेबहुत धान्य होते. तेही संपले. घरात एक छद्दाम नाही. शेवटी पाण्यावरच दिवस ढकलण्याची वेळ त्यांच्यावर आली.

तब्बल दोन दिवस या कुटुंबीयांनी उपाशी काढले. भूक असह्य झाली. शरीर अशक्त व्हायला लागले. सत्तर वर्षांची अनुसया आणि तिच्या मुलाचाही धीर सुटला. दोन्ही गतिमंद मुलं जेवणाची मागणी करायचे. त्यांना काय उत्तर द्यावे, हे मायलेकांना समजेना. आता त्यांना मृत्यू जवळ दिसायला लागला. मात्र, जगण्याची धडपड माणसाला काय करायला लावते, हे त्यानंतर घडले. 

माट्टेवार कुटुंबाने वाटणी करून भागवली भूक

घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या एका महिलेने वाचलेले शिळे अन्न उकिरड्यावर फेकले. ते उकिरड्यावरील अन्न बघून भुकेलाही पान्हा फुटला. शेवटी माट्टेटवार कुटुंबीयांचा संयम सुटला. फेकलेल्या पोळ्या व भात उचलून आणले. सर्वांनी वाटणी करून भूक भागविली. दरम्यान हा प्रकार याच परिसरातून जाणाऱ्या अफरोज पठाण या युवकाने बघितला. त्याने विचारपूस केली. तेव्हा त्याच्यासमोर या सुन्न करणाऱ्या घटनेची माहिती आली.

अफरोज पठाणने केली मदत

माट्टेवार कुटुंबीय भुकेने व्याकुळ असल्याचे समजताच अफराज पठाणने गावातील एक किराणा दुकानदार अंकुश धांडे, मनोज डोंगरे, अनंता खापर्डे, राहुल बन्सोड यांच्या कानावर हा प्रकार घातला. या सर्वांनी आपापल्या परीने तांदूळ, किराणा, भाजीपाला आणि पीठ माट्टेटवार कुटुंबीयांकडे पोहोचते केले. आणखी मदत लागल्यास देऊ असा धीर त्यांना दिला. मात्र, या घटनेमुळे लॉकडाऊनने गरीब लोकांचे जगणे किती असह्य झाले, याचे वेदनादायी चित्र समोर आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com