...अन्‌ शेतकरी पिता-पुत्रांनी "अन्नदाता' हे नाव सार्थ ठरविले! 

Gahu Watap
Gahu Watap

पुसद (जि. यवतमाळ) : कोरोनाच्या संकटात शेतमजूर, अपंग आणि निराधारांची अन्नान्न दशा पाहून संवेदनशील मनाला माणुसकीचा पाझर फुटला अन्‌ गौळ (खुर्द) येथील मारोतराव व सचिन हराळ या शेतकरी पिता-पुत्रांनी आपल्या शेतात पिकलेला बारा पोते गहू गावातील गरजूंना वाटला. त्यासोबत चार क्विंटल तांदूळ दुकानातून विकत घेऊन गव्हासोबत तांदळाचा "शिधा-आटा' गरिबांच्या दारात पोहोचविला. 

पुसद तालुक्‍यातील गौळ (खुर्द) येथील शेतकरी मारोतराव हराळ यांची पाच एकर शेती आहे. त्यांनी रब्बी गव्हाची दीड एकरात लागवड केली. एकूण 16 पोती गहू घरात आला. त्यांचे पुत्र सचिन हराळ यांनी मेहनत घेतली. दरम्यान, लॉकडाउनमुळे सारे रहाटगाडगे थांबले. हातावर पोट असलेल्या शेतमजुरांची दैन्यावस्था सुरू झाली. अशातच गौळ (खुर्द) येथील चंद्रभागा पवार ही विधवा महिला पुसद लगतच्या श्रीरामपूर पोस्ट ऑफिसमध्ये आली असता तिची सैरभैर अवस्था पाहून मारोतराव हराळ यांनी तिची चौकशी केली. तिच्यासोबत दुसरी महिला लहान बाळ घेऊन आली होती. या दोन्ही महिला पोस्टातून पाचशे रुपये काढण्यासाठी 20 किलोमीटर अंतर पायी चालत आल्या होत्या. त्यांना "केवायसी' शिवाय पैसे मिळणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यांची ही कथा ऐकून संवेदनशील मनाचे शेतकरी मारोतराव हराळ व्यथित झाले. त्यांनी लगेच लहान बाळासाठी बिस्किट व पाणी बोलाविले.

मारोतराव व पुत्र सचिन यांनी चिंता व्यक्त केली

या घटनेनंतर मारोतराव व त्यांचे पुत्र सचिन यांनी शेतमजूर व गरजू लोकांच्या होत असलेल्या हालअपेष्टांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांना अशा कठीण समयी मदत केली पाहिजे, अशी भावना जागृत झाली. या पिता-पुत्रांनी शेतातून घरी आलेला गहू गौळ (खुर्द) गावातील शेतमजूर व गरजू व्यक्तींना वाटप करण्याचा निर्णय घेतला. केवळ गव्हाने भागणार नाही तर तांदूळही दिला पाहिजे, असे ठरवून त्यांनी पुसदवरून चार क्विंटल तांदूळ विकत घेतला. हा निर्णय ग्रामपंचायतच्या सरपंच दीपाली संतोष टाकरस व ग्रामसेवक भारत साखरे यांना सांगितला. ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने यादी तयार करून गावातील शेतमजूर, निराधार, अपंग व गरजू अशा एकूण 173 कुटुंबांना घरोघरी जाऊन गहू व तांदळाचे रविवारी (ता. 19) वाटप करण्यात आले. यासाठी त्यांना कृषी सहायक अनिल खरे, नंदकुमार हराळ, पांडुरंग टाकरस, रवी माने, बाळू शेळके, राजू कांबळे, सुधाकर चव्हाण, बळीराम राठोड, गीता कांबळे, नागेश बेले यांनी मदत केली. हराळ पिता-पुत्रांच्या या मदतीने निराधार कुटुंबांना आधार मिळाला. त्यांनी या शेतकरी पिता-पुत्रांचे आभार मानले. शेतकरी हा खऱ्या अर्थाने "अन्नदाता' आहे, हे हराळ पिता-पुत्रांनी सार्थ ठरविले, एवढे नक्की! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com