धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : शेतकऱ्यांचा आवडता सण बैलपोळा हा अवघ्या एका दिवसावर आला आहे. ग्रामीण भागातील कृषी संस्कृतीत बैलपोळ्याला खूप महत्त्व आहे. बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा होय. त्यानिमित्ताने आज (ता.17) बैलांची खांद शेकणी करून "आज आवतन घ्या, उद्या जेवायला या", अशी साद शेतकरी बैलांना घालून आमंत्रण देणार आहेत. परंतु कोरोनामुळे 18 ऑगस्ट रोजी साजरा होणारा बैलपोळा सण घरीच साजरा करावा लागणार असल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
बैलपोळा मंगळवारी (ता.18) आहे. त्यामुळे आज संध्याकाळी बैलांची तूप व हळदीने खांदशेकणी करण्यात येणार आहे. वर्षभर बैलांच्या खांद्यावर ओझे असते. पोळ्याच्या निमित्ताने बैलांच्या खांद्याला तूप आणि हळद लावून शेकण्यात येते. पोळ्याचा पहिला दिवस म्हणजे वाडबैलाचा. यादिवशी मातीच्या बैलांची व घरच्या बैलजोडीची खांद शेकून महादेवाचे गाणे म्हणत हरहर महादेवाचा गजर करीत पूजा केली जाते.
दुसरा दिवस म्हणजे बैलपोळा होय. यावर्षी जगभरात कोरोनाची महामारी असल्याने सर्वच सणांवर पायबंद घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे यंदा बैलपोळा सणावर कोरोनाचे सावट आहे. बैलपोळा भरणार नसून घरीच हा सण साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोरोनाच्या संकटातच शेतकऱ्यांना आपल्या जिवाभावाच्या लाडक्या सर्जा-राजांना साज चढवून घरीच पोळा सण साजरा करावा लागणार आहे.
दरम्यान पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांना लागणारे विविध सजावट साहित्यांची दुकाने येथील बाजारपेठेत सजू लागली आहे. शेतकरी मोठ्या आवडीने दुकानात जाऊन आपल्या लाडक्या बैलजोडीला शोभेल, असे साहित्याची पारख करून खरेदी करू लागला आहे.
बैलपोळा सण 18 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. यादिवशी सायंकाळी परिसरातील सर्व बैलांना हनुमान मंदिरासमोर एकत्र आणले जाते. पाटलांच्या मानाच्या बैलांचे आगमन झाल्यानंतर सर्व शेतकरी आपापल्या बैलांना वेशीतून पळवत नेतात. नंतर हनुमान मंदिरास प्रदक्षिणा मारून बैलांना घरी नेले जाते. काही शेतकरी बैलांची वाजत-गाजत मिरवणूक काढतात. परंतु यावर्षी मिरवणूक काढता येणार नाही व बैलपोळा पण भरणार नाही.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.