राज्य सरकारची मदतीची घोषणा हवेत; शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

सूरज पाटील
Friday, 13 November 2020

राज्य सरकारने मदतीची घोषणा केली. प्रत्यक्षात मदत मिळाली नाही. केंद्र व राज्य सरकारच्या भांडणात शेतकरी भरडला जात आहे. परिणामी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

यवतमाळ : दिवाळी अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्‍टरी दहा हजार रुपये मदतीची घोषणा केली होती. दिवाळीपूर्वी मदत मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्याही प्रकारची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी अंधारात जाणार असल्याने शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली आहे.

खरीप हंगाम शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारा ठरला. मागील चार वर्षांपासून शेतकरी सतत नापिकीचा सामना करीत आहेत. परतीच्या पावसाने सोयाबीन व कपाशीचे अतोनात नुकसान केले आहे. बोंडसड व बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कपाशी पिकावर ट्रॅक्‍टर फिरविला. शेतकऱ्यांच्या घरात क्विटंलने येणारा कापूस यंदा केवळ दहाच-वीस किलो या प्रमाणातच आला आहे. सोयाबीनचेही मातेरे झाले.

सविस्तर वाचा - बाप रे बाप! बाजारात आली २४ कॅरेट अस्सल सोन्याची मिठाई; किंमत ऐकून व्हाल थक्क

शेतकऱ्यांनी लागवडीसाठी केलेला खर्च निघाला नाही. "सीसीआय'ने कापूस खरेदी सुरू केली नाही. कापूस ओला असल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र, शेतकऱ्यांना हे कारण पटत नाही. घरात असलेला कापूस खराब होऊ नये, म्हणून शेतकरी कापूस कवडीमोल भावाने विक्री करीत आहेत.

खेडाखरेदीत शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. दिवाळीला कापूस, सोयाबीन विक्रीतून आलेल्या पैशांतून शेतकरी खरेदी करतात. यंदा चित्र उलटेच आहे. शेतातील उत्पन्न निघाले नाही.

अधिक माहितीसाठी - चहा विक्रेत्याच्या मुलाने उभारली बँक; विपरित परिस्थितीवर मात करीत गाठले यशोशिखर

राज्य सरकारने मदतीची घोषणा केली. प्रत्यक्षात मदत मिळाली नाही. केंद्र व राज्य सरकारच्या भांडणात शेतकरी भरडला जात आहे. परिणामी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांना मदत मिळाली, यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

काळी दिवाळी करण्याची वेळ
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. सीसीआयने अजूनही कापूस खरेदी सुरू केली नाही. खेडाखरेदीत शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. राजकीय नेत्यांच्या घरी जाऊन काळी दिवाळी करण्याची वेळ आली आहे.
- साहेबराव पवार, शेतकरी

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

राज्य, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक
राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात पडेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही मदत मिळाली नाही. राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे.
- सिकंदर शहा,
अध्यक्ष, शेतकरी वारकरी संघटना, यवतमाळ

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Diwali in the dark no help by Goverment