काळे विधेयक रद्द केल्याशिवाय परतणार नाही, दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांचा निर्धार

प्रशिक मकेश्वर
Sunday, 3 January 2021

आज सकाळी तुकडोजी महाराजांचे दर्शन घेऊन हे हजारो कार्यकर्ते नागपूर आणि तेथून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी मोझरी व तिवसा येथे सभा घेत काळे विधेयक रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी यावेळी बोलताना केला.

तिवसा (जि. अमरावती ) : गेल्या एक महिन्यापेक्षाही अधिक काळापासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी दिल्लीला निघाले आहेत. अनेक शेतकरी हे रात्रीपासूनच तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरीमध्ये मुक्कामाला होते. आज सकाळी तुकडोजी महाराजांचे दर्शन घेऊन हे हजारो कार्यकर्ते नागपूर आणि तेथून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी मोझरी व तिवसा येथे सभा घेत काळे विधेयक रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी यावेळी बोलताना केला.

हेही वाचा - 'औषध निर्माण कंपनीत राणा दाम्पत्य लाटतंय फुकटचे श्रेय'

केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात मागील एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणातील लाखो शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी हे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत.

हेही वाचा - फक्त एका क्लिकवर सर्व शेतकरी योजनांचा लाभ, कसा कराल ऑनलाईन अर्ज?

राज्यातील कोल्हापूर, नाशिक अहमदनगर यासह अन्य काही जिल्ह्यातून निघालेले हजारो कार्यकर्ते आज मोझरीत दाखल झाले होते. मोझरी व तिवसा येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले तर त्यानंतर त्यांनी सभा घेत आपली भूमिका स्पष्ट करत केंद्र सरकारवर निशाना साधला यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य सचिव तुकाराम भस्मे,सुभाष लांडे,नामदेव गवाडे, राजन शिरसागर, नामदेव चव्हाण, राम बाहेती, विजय रोडगे, लक्ष्मण धाकडे,अशोक सोनारकर,प्रकाश सोनोने,सागर दुर्योधन, चंद्रकांत वडस्कर उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers went to delhi from amravati to support farmers agitation