मेळघाट व्याघ्रप्रकल्पांतर्गत ठिपकेदार कस्तूर पक्ष्याची प्रथमच नोंद

The first record of a spotted musk bird Amravati bird news
The first record of a spotted musk bird Amravati bird news

अमरावती : मेळघाट व्याघ्रप्रकल्पांतर्गत पूर्व धारगड बीटमध्ये ठिपकेदार कस्तूर पक्ष्याची प्रथमच नोंद करण्यात आली आहे. महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, पुरवठा विभागाचे उपायुक्त अजय लहाने, भूसुधारचे सहायक आयुक्त श्‍याम म्हस्के, राहुल गुप्ता आणि मनोज बिंड यांना ७  मार्च रोजी निसर्ग भ्रमंती व वन्यजीव छायाचित्रण करताना अत्यंत दुर्मीळ अशा ठिपकेदार कस्तूर पक्ष्याची छायाचित्रासह महत्त्वपूर्ण नोंद करण्यात यश प्राप्त झाले आहे.

सर्व कस्तूरवर्गीय पक्ष्यांमध्ये हा ठिपकेदार कस्तूर अधिक आकर्षक दिसतो. या पक्ष्याचे इंग्रजी नाव 'स्केली थ्रश' असे असून शास्त्रीय नाव झ्यूथेरा डॉमा, असे आहे. झाडावर बसलेल्या कस्तूर पक्षाच्या अंगावरील वेगळ्या ठिपक्‍यांमुळे लगेच लक्ष गेल्यावर याचे छायाचित्र काढण्यात आल्याचे मनोज बिंड यांनी सांगितले. साधारणपणे या पक्ष्याची लांबी २७ ते ३१ सेमी असून, त्याच्या शरीराच्या फिकट पिवळसर रंगावरील छोट्या छोट्या रेषासदृश ठिपक्‍यांची रचना ही याची मुख्य ओळखीची खूण आहे.

पोटाचा भाग पांढरा असून त्यावरही ठिपके असतात व पाय फिकट नारिंगी गुलाबी असतात. सतत कूजन न करणारा हा पक्षी अधूनमधून ५ ते १० मिनिटांच्या अंतराने "ट्‌वि-टू-टू', अशी स्पष्ट आणि तीव्र शीळसुद्धा घालतो. हा पक्षी अतिशय लाजाळू आहे. त्यामुळे फारसा उघड्यावर येत नसल्याने सहज दृष्टीस पडत नाही.

घनदाट अरण्य आणि गर्द झाडांमध्येच याचे अस्तित्व आढळून येते. त्यामुळे याला शोधणे फार कठीण आणि संयमाचे काम आहे. याचे नर आणि मादी हे दिसायला सारखेच असून मादी ही छोट्या वाटीसारख्या खोलगट घरट्यात तीन ते चार राखाडी हिरवट रंगांची अंडी घालते.

सामान्यपणे छोटे कीटक आणि कृमी हे याचे खाद्य असून याच्या दुर्मीळतेमुळे फारशी सविस्तर माहिती उपलब्ध होत नाही व याला अद्याप प्रमाणित मराठी नामनिधानसुद्धा प्राप्त झालेले नाही. मलेशियासह हा पक्षी भारताच्या केवळ उत्तर भागात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे आढळून येतो. ई-बर्ड यासारख्या जागतिक दर्जाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या पक्षाची ही महाराष्ट्रातील छायाचित्रासह खात्रीशीर अशी प्रथमच नोंद ठरली असल्याचेही श्री. बिंड यांनी सांगितले.

पर्यटकांनी जैवविविधतेची दखल घ्यावी

वाघ आणि इतर वन्यजीव याकरिता सुप्रसिद्ध असलेले मध्य भारतातील मेळघाटचे जंगल हे कित्येक दुर्मीळ विविध वनस्पती, सरीसृपवर्गीय प्राणी आणि पक्ष्यांकरिता राष्ट्रीयस्तरावर प्रसिद्ध होऊ पाहत आहे. त्यामुळे व्याघ्रदर्शनाची आस घेऊन येणारे पर्यटक, अभ्यासक आणि संशोधक यांनी मेळघाटच्या या जैवविविधतेचीसुद्धा योग्य दखल घेऊन मेळघाट परिसरातील निसर्गाचा असा विविधांगी आस्वाद घेणे महत्त्वाचे असल्याचे मत मनोज बिंड यांनी व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com