शेतकऱ्यांना होती पावसाची प्रतीक्षा; पाऊस झाला खरा, पण...

चेतन देशमुख
शनिवार, 4 जुलै 2020

जिल्हा गेल्या काही दिवसांपासून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता. अनेक भागात कमी, जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे. पाऊस कमी आणि उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे निघालेले पीक करपण्याची भीती होती. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते.

यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. पावसाअभावी पिके करपण्याची शक्‍यता वर्तविली जात होती. शुक्रवारी जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने 'एन्ट्री' केली. पावसाने पिकांना संजीवनी मिळाली असली तरी काही भागात ढगफुटी सारखा पाऊस कोसळल्याने शेत खरडून गेले आहे. अनेक शेतात पाणी साचल्याने निघालेले पीक पाण्यात असून, शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभे ठाकले आहे.

जिल्ह्यात यंदा नऊ लाख हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी जवळपास आठ लाख हेक्‍टरवरील पेरणी आटोपली आहे. जिल्हा गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता. अनेक भागात कमी, जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे. पाऊस कमी आणि उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे निघालेले पीक करपण्याची भीती होती. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते.

क्लिक करा - पत्नीला पडला प्रश्‍न, पतीचा मृत्यू नेमका झाला कुठे? वाचा धक्‍कादायक प्रकार...

शुक्रवारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार 'कमबॅक केले. दारव्हा, नेर परिसरात तर ढगफुटी सारखा पाऊस कोसळला. तब्बल एक तास झालेल्या मुसळधार पावसाने नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले होते. नदी, नाल्यांच्याकाठी असलेल्या शेतात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. शिवाय पावसाचे पाणी शेतातून वाहून गेले. पाण्यासोबत शेतात पेरलेले पीक खरडून गेले.

दारव्हा तालुक्‍यातील बोरी अरब परिसरात ढगफुटी सारखा पाऊस झाला. यात अनेक शेतात पाणी साचले. पावसाच्या पाण्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. निघालेले पीक आडवे झाले. अनेक अडचणीच्या श्रृखंलेच्या मालीकेत नवे संकट जोडले गेले आहे. आधीच सोयाबीनचे बियाणे उगवत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. पावसाने सोयाबीन, तूर, कापूस, अद्रक, हळद यासह अनेक पिकांना फटका बसला आहे. पावसाने जमिनी खरडून गेल्याने मोठे संकट शेतकऱ्यांवर आले आहेत.

जाणून घ्या - मध्यरात्री कोविड केअर सेंटरमध्ये माजली खळबळ; काय झाले असे?

बोरी परिसरात नुकसान

बोरी अरब परिसरात झालेल्या पावसाने सुभाष काकडे यांच्या शेतातील हळद, अद्रक खरडून गेले आहे. त्यांनी पाच एकरांपैकी अडीच एकरात अद्रक व हळदीची लागवड केली होती. यातील हळद, अद्रक यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय, स्वप्नील गौरकार यांच्या शेतातील सोयाबीनचे नुकसान झाले आहे. प्रमोद दरोळे यांच्या शेतात नाल्याचे पाणी शिरल्याने सोयाबीन खरडून गेले.

पंचनाम्याचे आदेशाची प्रतीक्षा

मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, पंचनामे करण्याचे आदेश अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान पावसाने झाले आहे. अशा शेतकऱ्यांनाबाबत काय निर्णय होणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains damaged fields in Yavatmal district