
तिवसा (जि. अमरावती) : उच्च शिक्षण घेतलं की, अनेक तरुण वडिलोपार्जित असलेल्या शेतीकडे पाठ फिरवतात. मात्र, तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील 30 वर्षीय युवकाने पाच वर्षे एलएलबीचे उच्चशिक्षण घेऊनही अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. एवढ्यावर न थांबता गावात परत येत आपल्या शेतात पॉली हाऊस उभारत शेतीत नवनवीन प्रयोग यशस्वी केले.
वडिलोपार्जित असलेल्या शेतीत प्रसन्न उमपने उच्चशिक्षण घेऊन अत्याधुनिक शेती करण्याचा ध्यास घेतला. नोकरीच्या मागे न लागता व वेळ व्यर्थ न घालवता त्यांनी वडील करीत असलेल्या शेतीची धुरा हाती घेतली. वयाच्या 22 व्या वर्षी 2012 साली त्यांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर त्यांनी घरी असलेल्या वडिलोपार्जित शेतीत राबण्यास सुरुवात केली. वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीतच सोने उगवण्याचा चंग त्यांनी मनाशी बांधला. आता त्यांचं वय 30 वर्ष आहे. या 8 वर्षांच्या काळात त्यांनी शेतात "जलबेरा' फुलशेती शेडनेट उभारून यशस्वी केली. त्यातून त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले.
प्रसन्न यांनी आता आणखी दोन शेडनेट उभारून त्यात शहरी भागात दिवसेंदिवस मागणी वाढत असलेल्या "ब्रोकली'चे पीक घेतले. तर आपल्या 8 एकर शेतीत त्यांनी तीन पॉली हाऊस उभारत यात भाजीपाला पेरला यात त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्नसुद्धा मिळाले. त्यांनी आता तरुण वयातच शेतीचा व्यवसाय निवडला असल्याने त्यांची दखल अनेक सामाजिक संघटनांनी घेतली व त्यांना कृषिरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
उच्च शिक्षण घेऊन नोकरी लागली नाही तर अनेक तरुण निराश होतात. परंतु प्रसन्न यांनी तसे न करता शेती व्यवसायच सर्वोत्तम असल्याचे दाखवून दिले. या तरुण उच्चशिक्षित तरुणाने इतर तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
पारंपरिक शेतीत सध्या गहू, सोयाबीन, कापूस, हरभरा, संत्रा आदी पिके शेतकरी घेतात. मात्र, नैसर्गिक आपत्ती, पिकाची लागवड ते काढणीपर्यंतचा खर्च, मजुरी या सर्वातून शेवटी पदरात पडणारे उत्पन्न याचा सर्व हिशेब जर काढतो म्हटलं की शेतकरी तोट्यात जातो. त्यामुळे प्रसन्नने यातून मार्ग काढला. त्यांनी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत आठ एकराच्या शेतात प्रयोगशील शेती करत लाखोंचे उत्पन्न घेतले. यामध्ये उमप यांनी अद्रकासह विविध पालेभाज्या पिकवून मोठे उत्पन्न घेत आहे.
मेहनतीने काहीही शक्य
जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर अशक्य असे काहीच नाही. तरुणांनी हताश न होता. जिद्दीने कोणतेही काम केले पाहिजे. कामात सातत्य असले की यश हमखास मिळते.
प्रसन्न उमप, प्रगतिशील शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.