मोबाईल चॅट डिलिट करून आयआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल

संतोष ताकपिरे
Monday, 14 December 2020

वरोरा येथील तरुणाच्या भीतीमुळे आपल्या मुलाने आत्महत्या केली, असा आरोप मृत तरुणाच्या पालकांनी तक्रारीत केला. त्याआधारे पोलिसांनी वरोरा येथील तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

अमरावती : गाडगेनगरहद्दीत राहणाऱ्या व अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेल्या तरुणाने मोबाईलवर केलेले चॅट डिलिट करून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येप्रकरणी पालकांनी केलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी वरोरा येथील तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा - प्रेताच्या राखेतून भाकर शोधते माय, माणसाच्या अंतातून सुरू होते कोणाच्या तरी जगण्याची धडपड

आत्महत्या करणारा अमरावतीचा तरुण बाहेर राज्यातील एका आयआयटी महाविद्यालया अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाला शिकत होता. तो लॉकडाउनमुळे अमरावतीमध्ये घरीच होता. त्याची एका मुलीसोबत  मैत्री होती. मात्र, त्या तरुणीची आधी वरोरा येथील तरुणासोबत मैत्री होती. त्यांचे काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झाले होते. त्यावरून आत्महत्या करण्यापूर्वी अमरावती व वरोरा येथील तरुण या दोघांमध्ये वाद सुरू होता. असे गाडगेनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा - आवाज कितीही बेसूर असला तरी गायला लावतात गाणी, पहाटेचा मानसिक 'आउटलेट'

आत्महत्येपूर्वी अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने वरोरा येथील तरुणाची समजूतदेखील काढली होती. त्यांच्यातील वाद वाढत गेला. त्यातून वरोऱ्याच्या तरुणाने अमरावतीच्या तरुणास जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिल्याचा आरोप आहे. वरोरा येथील तरुणाच्या भीतीमुळे आपल्या मुलाने आत्महत्या केली, असा आरोप मृत तरुणाच्या पालकांनी तक्रारीत केला. त्याआधारे पोलिसांनी वरोरा येथील तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा - प्रेमाला हिंसेची किनार, फोटोंचा होतोय अस्त्रासारखा वापर; आपल्या मुलांची अशी घ्या काळजी

आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांचे बयाण नोंदविले. आत्महत्येपूर्वी जे मोबाईल चॅट विद्यार्थ्याने डिलिट केले ते नेमके कसे होते, याची माहिती पोलिस घेत आहेत.
- मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: iit student commit to suicide in amravati