मुख्याधिकारी व उपनगराध्यक्ष यांच्यात शाब्दिक चकमक

nagar palika workers.jpg
nagar palika workers.jpg

देऊळगावराजा (जि.बुलडाणा) : सर्वसाधारण सभेनंतर पालिका मुख्याधिकारी व उपनगराध्यक्ष यांच्यात शहरातील मुख्य समस्यांबाबत चर्चा सुरू असताना मुख्याधिकारी यांच्या दालनात शाब्दिक चकमक उडाल्याचा प्रकार (ता.23) दुपारी घडला. दरम्यान महिला अधिकाऱ्यांशी झालेल्या अरेरावीचा निषेध म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद करून कार्यालयाच्या मुख्यद्वारावर घोषणा देऊन एक प्रकारे पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी विरुद्ध रणसिंग फुंकले.

नगरपालिका सभागृहात सकाळी 11 वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी काही विषयावर ऐनवेळी टिपण मिळाल्याने त्या विषयावर चर्चा करणे नगरसेवकांना अडचण आहे. नियमानुसार सभेच्या नोटीस बरोबरच मुख्याधिकारी यांनी टिप्पणी द्यायला पाहिजे या कारणावरून बैठकीदरम्यान वातावरण तापले. त्यातच जालना मार्गावरील मुख्य रस्त्या लगत असलेल्या मटण मार्केट बंदिस्त करा या मुद्द्यावर नगरसेवकांमध्ये आपसांत जुंपली.

नगरसेविकेला सभागृहातच कोसळले रडू
मागील महिन्यात याच मटण मार्केट जवळ डुक्कर आडवा आल्याने दुचाकी अपघात होऊन आपल्या दिरास प्राण गमवावे लागले म्हणून एका नगरसेविकेला सभागृहातच रडू कोसळले. या गंभीर बाबींमुळे सभागृह काही वेळ सुन्न झाले.

‘मॅडम सोबत आमचे बोलणे होऊ द्या तुम्ही नंतर बोला’
सभा संपल्यावर नागरिकांच्या मूलभूत गरजा वेळेवर सोडविण्यात येत नाही यावर चर्चा करण्यासाठी नगराध्यक्ष सुनीता शिंदे, उपनगराध्यक्ष प्रवीण झोरे यांच्यासह काही नगरसेवक व नगरसेविका मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्या दालनात गेले असता एका कर्मचाऱ्याने मॅडम सोबत आमचे बोलणे होऊ द्या तुम्ही नंतर बोला असे म्हणताच उपस्थित पदाधिकारी अवाक्‌ झाले. उपनगराध्यक्ष श्री. झोरे यांनी याबाबत जाब विचारले असता मुख्याधिकारी आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. 

पालिका पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध रणसिंग
मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात कर्मचाऱ्याने पदाधिकाऱ्यांना उद्धटपणे बोलून अपमान केल्याची भावना नगरसेवकांनी व्यक्त केली तर महिला अधिकाऱ्यांना अयोग्य वागणूक दिल्याच्या निषेधार्थ नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या मुख्य द्वारावर ठिय्या देऊन सदर घटनेचा निषेध नोंदविला. पालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने दडपशाही विरोधात घोषणा देऊन मुख्याधिकारी श्रीमती घार्गे यांच्या पाठीशी असल्याचे दर्शवून कर्मचाऱ्यांनी पालिका पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध एक प्रकारे रणसिंग फुंकले. सायंकाळी कार्यालयीन वेळ संपेपर्यंत सर्व कर्मचारी कार्यालयाबाहेर ठिय्या देत होते. आज मुख्याधिकारी यांच्या दालनात घडलेल्या शाब्दिक चकमकीमुळे मुख्याधिकारी आणि पालिका पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली तर पालिकेचे राजकीय वातावरणही तापले.

पदाधिकाऱ्यांचा सन्मान दुखावेल असे वर्तन
नागरिकांची मूलभूत कामे वेळेवर होत नाही याबाबत चर्चा करण्यासाठी नगराध्यक्ष काही नगरसेवक आणि मी मुख्याधिकारी यांच्या दालनात गेलो होतो. त्यांच्याशी बोलत असताना एका कर्मचाऱ्याने अनपेक्षितपणे मधात बोलून पदाधिकाऱ्यांचा सन्मान दुखावेल असे वर्तन केले. पालिका प्रशासनाकडून नागरिकांची कामे करून घेण्यासाठी मुख्याधिकारी यांच्यासह प्रत्येक विभागाच्या विभाग प्रमुखांशी समन्वय साधने आवश्‍यक आहे. पदाधिकाऱ्यांच्या सन्मान राखला जात नसेल तर विकासात्मक कामासह नागरिकांच्या समस्या सोडविणे कठीण आहे.
- प्रवीण झोरे, उपनगराध्यक्ष, देऊळगावराजा

मुख्याधिकाऱ्यांसोबत संपर्क नाही
सदर प्रकरणात प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलो असता मुख्याधिकारी निवेदिता घार्गे नगरपालिकेत उपस्थित नव्हत्या. यांच्याशी भ्रमणध्वनीवर अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com