भंडारा रुग्णालय आग : 'त्या' मातांची नियमित समुपदेशन करा, अ‌ॅड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

minister yashomati thakur visit to bhandara hospital
minister yashomati thakur visit to bhandara hospital

भंडारा : सामान्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बालकांच्या मातांचे नियमित आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्याचे निर्देश माहिला व बाल कल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले. आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनास्थळाची पाहणी करताना त्यांनी अधिकाऱ्यांना उपरोक्त निर्देश दिले.

यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसंगे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीसंदर्भात संपूर्ण घटनाक्रमाची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडून ठाकूर यांनी घेतली. शिशू केअर युनिटला मध्यरात्री लागलेल्या आगीत आयसीयूमध्ये दाखल असलेल्या दहा बालकांचा मृत्यू झाला तर, सात बालकांना वाचविणे शक्‍य झाले. 

आग विझविण्यासाठी सुरक्षा रक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. त्यानंतर अग्निशमन विभाग तत्काळ घटनास्थळी पोहोचल्यामुळे आगीवर नियंत्रण शक्‍य झाले. सामान्य रुग्णालयातील डॉक्‍टर व परिचारिका यांनी तत्काळ बालकांना इतर वॉर्डात हलविले. तसेच नातेवाइकांना बालकांचे मृतदेह सुपूर्द करण्यात आले. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याच्या दृष्टीने न्यायवैधक तज्ज्ञांची टिम, इलेक्‍ट्रिकल निरीक्षक, व्हीएनआयटी,राष्ट्रीय अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ज्ञ, विद्युत, सार्वजनिक बांधकाम आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. त्यांचा अहवाल लवकरच मिळणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी  सांगितले.

अंगणवाडी सेविकांकडून नियमित तपासणी -
एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त इंद्रा मालो यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून सदर मातांची अंगणवाडी सेविका, आशा व एएनएम यांच्याकडून नियमित आरोग्य तपासणी करून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे निर्देश दिले.  घटनेत मृत झालेली बालके संबंधित रुग्णालयात का दाखल करण्यात आली होती, याबाबतचा अहवाल तत्काळ आयुक्तालयास पाठविण्याचे निर्देशही त्यांनी पत्राद्वारे दिले आहेत.

मातांच्या आरोग्याकडे लक्ष द्या -
जळीत प्रकरणांतील मृत बालकांच्या माता योगिता विकेश धुळसे श्रीनगर व रावणवाडी येथील वंदना मोहन सिडाम यांना ऍड. ठाकूर यांनी भेट देवून त्यांचे सांत्वन केले. मातांच्या आरोग्याविषयी कोणतीही हयगय होता कामा नये. मातांचे शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com