अपहरणाचा डाव तडजोडीवर आटोपला, माय-लेकीनेच दिली कबुली

mother and her daughter give explanation in nagbhid kidnapping case chandrapur
mother and her daughter give explanation in nagbhid kidnapping case chandrapur

चंद्रपूर : लग्न मोडल्याने संतापलेल्या मुलाने मित्रासह मुलीचे गाव गाठून तिचे आणि तिच्या आईचे अपहरण केले. स्थानिक गुन्हे शाखा, नागभीड पोलिसांनी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी करून मध्यप्रदेश सीमेवरून युवती आणि आईची सुटका केली. संबंधित युवतीने हात-पाय धरून आपल्याला गाडीत टाकून पळविल्याचे एका पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, नागभीड पोलिस ठाण्यात मुलीने व तिच्या आईने सहमतीने सोबत गेल्याचे बयाण दिले. त्यामुळे नागभीड पोलिसांनी अपहरण करणारा मुलगा आणि त्याच्या मित्राला सोडून दिले. मुलीच्या सहमतीच्या बयाणावर पोलिसांची धावाधाव आणि अपहरणाचा डाव थांबला. 

पाहर्णी येथील एका मुलीचे नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्‍यातील रुयाळ येथील रामकृष्ण भोयर या युवकाशी लग्न जुळले होते. काही दिवसांपूर्वी साक्षगंधही झाले होते. मात्र, मुलाची वर्तणूक चांगली नसल्याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी लग्न तोडत असल्याचे मुलाच्या कुटुंबीयांना कळविले. मुलीच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयामुळे मुलाचा राग अनावर झाला. मंगळवारी (ता. 12) सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास रामकृष्ण भोयर व त्याचे मित्र वाहनासह मुलीच्या गावात दाखल झाले. रामकृष्ण आणि त्याच्या एका मित्राने मुलीच्या घरात प्रवेश करून बळजबरीने उचलून गाडीत टाकले. दरम्यान, तिच्या आईने आरडाओरड सुरू करताच तिलाही आरोपीने बळजबरीने उचलून गाडीत टाकून गावातून पळ काढला. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची धावाधाव सुरू झाली. प्रकरण पोलिस अधीक्षकांपर्यंत गेले. पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना आरोपींना तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित ग्रामीण नागपूर पोलिसांची मदत घेतली. नाकाबंदी केल्यानंतर मध्यप्रदेश सीमेवरील केळवद पोलिस ठाणे हद्दीत मुलगा रामकृष्ण भोयर, चालक, मुलगी आणि तिची आई एका वाहनात आढळून आले. नागभीड पोलिसांनी मुलगी आणि तिच्या आईला ठाण्यात आणले. मुलीने व तिच्या आईने आपण सहमतीने गेल्याचे बयाण दिले. त्यामुळे नागभीड पोलिसांनी रामकृष्ण भोयर आणि चालकाला सोडून दिले.

पाहर्णी येथील एका मुलीचे आणि तिच्या आईचे अपहरण झाल्याची प्राथमिक तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर पोलिसांनी मध्यप्रदेश सीमेवरून मुलगी आणि तिच्या आईला ताब्यात घेतले. परंतु, त्यांनी आपण सहमतीने गेल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
- मडामे, पोलिस निरीक्षक, नागभीड

पोलिस अधिकाऱ्यांच्या संवादात अपहरणाची कबुली -
मध्यप्रदेश सीमेवरून पोलिसांनी मुलगी आणि आईला ताब्यात घेतले. त्यानंतर या मुलीने एका पोलिस अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संवाद साधला. यावेळेस तिने स्वत: आपणाला घरातून हातपाय धरून वाहनात टाकून अपहरण केल्याची कबुली दिली आहे. मात्र, पोलिस ठाण्यात आपण स्वत: सहमतीने गेल्याचे बयाण दिले. त्यामुळे अपहरणकर्ते मोकाट सुटले. मुलीने आपले बयाण बदलविल्याने पोलिसांची धावपळ व्यर्थ गेल्याची चर्चा आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com