एका हाताने काटा करा आणि दुसर्‍या हाताने चुकारा करा!; खासदार हेमंत पाटील यांची संसदेत मागणी

MP hemant patil seeks for the money of farmers in parliament
MP hemant patil seeks for the money of farmers in parliament

यवतमाळ : बाजारपेठेतून आज टीव्ही खरेदी केला आणि पैसे तीन दिवसांनंतर दिले तर चालणार का, असा प्रश्‍न उपस्थित करीत शेतकर्‍यांच्या शेतमालाचा एका हाताने काटा करा आणि दुसर्‍या हाताने चुकारे करा’, अशी खणखणीत मागणी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभेत केली. ते अधिवेशनादरम्यान ’कृषी संवर्धन व सरळीकरण विधेयका’चे समर्थन करताना बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, भारत कृषिप्रधान देश आहे. देशात 80 टक्क्यापेक्षा जास्त शेतकरी दोन एकरांपेक्षा कमी जमीनक्षेत्र धारण करणारे आहेत. या विधेयकाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आपला माल कुणालाही विकण्याचा हक्क प्राप्त होणार आहे. त्यामुळे कृषिमंत्री नरेंद्र तोमर, कैलास चौधरी, रूपारेल यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. 

यापूर्वी शेतकरी कृषी उत्पन्न बाजार बाजार समिती कायद्याअंतर्गत येत असत. त्यामुळे त्यांना दलाल व अडत्यांमार्फतच आपला शेतमाल विकावा लागत होता. महाराष्ट्रात तर साखर सम्राटांनी ’झोनबंदी’ केल्याने ऊस उत्पादक बंदिस्त झाले होते. त्यामुळे शेतकरी आपला माल दुसरीकडे विकू शकत नव्हते. काही अडते, मध्यस्थ व दलालच शेतमालाचा भाव ठरवत. या विधेयकामुळे शेतकर्‍यांना आंतरराष्ट्रीयस्तरावर आपला माल विकण्याची मुभा मिळाली आहे. 

बाजारात कांदा आजच्या तारखेला 25 रुपये किलो विकला जात असताना शेतकर्‍यांना केवळ एक रुपया मिळतो. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दलालांच्या जोखडातून मुक्त करणे गरजेचे आहे. या विधेयांतर्गत शेतकर्‍याने बाजारपेठेत माल विकल्यावर त्याचे चुकारे देण्याची मुदत तीन दिवस करण्यात आली आहे. परंतु, आज बाजारपेठेत टीव्ही विकत घेतला आणि पैसे तीन दिवसांनी दिले तर चालेल का, असा प्रश्‍न उपस्थित करून खासदार हेमंत पाटील यांनी ’इकडे काटा करा आणि तिकडे नोटा द्या’ असे म्हणत शेतकर्‍यांची बाजू उचलून धरली. 

शेतकर्‍यांना नगदी चुकारे दिले तरच देशातील शेतकरी वाचू शकतील, असा भावनिक मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. शेतमालासंदर्भाने उपस्थित केलेला लवाद हा जिल्हाधिकार्‍यांच्या कक्षेत न चालविता तो तहसीलदारांकडे चालविण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

खासदार हेमंत पाटलांसारखा असावा : अशोकराव चव्हाण

नांदेड येथे एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी खासदार हेमंत पाटील यांची स्तुती करताना खासदार असावा तर हेमंत पाटलांसारखा असावा, असे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, खासदार हेमंत पाटील यांचे लक्ष विकासात्मक कामाकडे आहे. त्यांनी परभणी पासून रेल्वे सुरू करून विकासाला चालना दिली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com