पतंजलीला टाळे अन्‌ बेरोजगारीची कुऱ्हाड 

राजेश रामपूरकर 
रविवार, 15 डिसेंबर 2019

मिहानमधील योगगुरू रामदेव बाबांचा महत्वाकांक्षी प्रकल्प पतंजली फूड पार्कने गाशा गुंडाळल्याने येथील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारी कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे परिवाराचा चरितार्थ कसा सांभाळायचा, याची चिंताही अनेकांना आता अस्वस्थ करीत आहे. 

नागपूर : मोठा गाजावाजा करून मिहान प्रकल्प सुरू करण्यात आला. यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन विकत घेण्यात आली. यासाठी शेतकऱ्यांना चांगला मोबदला, नोकरी, पर्यायी जागाही देण्यात आली. या प्रकल्पात मोठमोठ्या कंपन्या येतील व युवकांना रोजगार मिळेल असे स्वप्नही दाखविण्यात आले. यामुळे अनेकांच्या आशाही पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, मिहानमधील योगगुरू रामदेव बाबांचा महत्वाकांक्षी प्रकल्प पतंजली फूड पार्कने गाशा गुंडाळल्याने येथील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारी कुऱ्हाड कोसळली आहे. कंपनी आर्थिक अडचणीचे कारण पुढे करीत कर्मचाऱ्यांचा अंतिम हिशेबही देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. 

हेही वाचा - मुलीची ममता : आईचा मृतदेह बघताच मुलीनेही घेतला जगाचा निरोप

पतंजलीने मिहान प्रकल्पात देशातील सर्वात मोठा फूड पार्क उभारण्यासाठी 234 एकर जागा घेतली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. पतंजलीला अवघ्या 25.50 लाख रुपये प्रति एकर दरात जागा दिल्याचा प्रश्‍न विरोधकांनी विधानसभेत उपस्थित करून तत्कालीन सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी नियमानुसार जागा दिल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

क्लिक करा - बापरे! येथे महिन्याला होतात सात खून

आता मात्र, या कंपनीच्या प्रकल्पाचे निर्माणकार्यच बंद झाले आहे. तसेच येथील कार्यरत कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. कमी करताना तातडीने अंतिम हिशेब करण्यात येईल असे कंपनीने कळविले होते. प्रकल्पाचे काम बंद होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र, अद्यापही त्या कर्मचाऱ्यांचा अंतिम हिशेब झालेला नाही. पाठपुरावा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. त्यामुळे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 

परिवाराचा चरितार्थ कसा सांभाळायचा?

रामदेव बाबांच्या घोषणेनुसार 2017 च्या अखेरपर्यंत उत्पादन सुरू करून दहा हजार युवकांना रोजगार देण्याचे स्वप्न दाखविले होते. मार्च 2019 मध्ये फूड पार्कचा पहिला टप्पा सुरू करण्याची घोषणा झाली होती. तोही मुहूर्त टळला होता. हळूहळू पतंजली फूड कंपनी आर्थिक अडचणीत सापडली. पतंजलीच्या फूड पार्कमधील अधिकाऱ्यांमध्ये फेब्रुवारी 2019 मध्ये मोठे फेरबदल केले. काहींनी नोकरीला "जय महाराष्ट्र' केला. प्रकल्प बंद केल्याने पतंजलीतील कर्मचाऱ्यांवर आता बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे परिवाराचा चरितार्थ कसा सांभाळायचा, याची चिंताही अनेकांना आता अस्वस्थ करीत आहे. 

अवश्य वाचा - मित्रासोबत पहाटे फिरायला गेला अन्‌...

कोट्यवधीची संपत्ती वाऱ्यावर

मिहानमध्ये पतंजलीचा आशियातील सर्वांत मोठा फूडपार्क उभारण्यासाठी विदेशातून दोन वर्षांपूर्वीच अत्याधुनिक यंत्रणा आणली. ते यंत्र प्रकल्पासाठी उभारलेल्या डोममध्ये ठेवण्यात आलेले आहेत. आतापर्यंत या प्रकल्पाची इमारत उभारण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला आहे. याच्या सुरक्षेसाठी तीन सुरक्षारक्षक कार्यरत असून, कोट्यवधीची संपत्ती वाऱ्यावर पडलेली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur Patanjali project is Locked