
नागपूर: आम्ही कीव्ह शहरापासून सुमारे आठशे ते नऊशे किलोमीटर लांब असलेल्या उझोरड शहरात होतो. उझोरड येथे बॉम्बस्फोट झाला नाही. मात्र, भयपूर्ण वातावरण होते. आम्ही राहात असलेल्या इमारतीवरून रशियन सैन्याचे हेलिकॉप्टर जायचे, असा थरारक अनुभव युक्रेन वरून नागपूरमध्ये परतलेल्या पारडी येथील स्वप्नील देवगडे याने सांगीतला.
युक्रेन येथून मायदेशी परतणाऱ्या स्वप्नीलसह गोंदियापासून जिल्ह्यातील कामठा या गावची रहिवासी असलेल्या भाग्यश्री कापसेचा नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारावलेल्या वातावरणात स्वागत करण्यात आले. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून युक्रेन या देशामध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे, केंद्र शासन विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत एअर इंडियाची विशेष विमाने पाठवित आहे. युक्रेन मधील ही सर्व स्थिती पूर्ववत व्हावी, असे सर्वांनाच वाटत असताना आपल्या सरकारने विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी विशेष विमान पाठविले. त्यामुळे आज आम्ही जिवंत असून कुठल्याही अडथळ्याविना घरी पोहचू शकलो, असेही स्वप्नील म्हणाला.
स्वप्नीलचे कुटुंबीय त्याला घेण्यासाठी विमानतळावर आले होते. मुलगा दिसताक्षणीच आई-वडिलांनी त्याला कवटाळले. पेढा भरवित तो हसत-हसत परत आल्याचा आनंद व्यक्त केला. नागपुरात पोहचताच दोन्ही मुलांच्या डोळ्यांत मायभूमीत आल्याचा आनंद आणि भारत सरकारने दाखविलेल्या तत्परतेचा अभिमान दिसत होता. भारत सरकार तसेच भारतीय दूतावास युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करत असल्याची भावना दोघांनीही बोलून दाखविली. स्वप्नील आणि भाग्यश्री हे दोघेही उझोरड विद्यापीठात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी असून तीन महिन्यांपूर्वीच ते युक्रेनला गेले होते. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून परदेशात गेलेल्या या दोघांनाही अल्पावधीतच अशा कठीण परिस्थितीला सामोरे जात परतावे लागेल, याची पुसटशीही कल्पना नव्हती. मुख्य म्हणजे जीवघेण्या स्थितीतून परतल्यानंतरही पुढील सहा महिन्यांत सर्व काही पूर्ववत झाल्यास युक्रेनला जाऊन शिक्षण पूर्ण करणार असल्याचा विश्वास या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
असा होता परतीचा प्रवास
उझोरड विद्यापीठातून विद्यार्थ्यांना शनिवार २६ फेब्रुवारीला हंगेरी बॉर्डरवर आणण्यात आले. बुडापेस्ट विमानतळाहून दिल्ली येथे सकाळी १० वाजता उतरविण्यात आले. त्यानंतर दिल्ली येथून सोमवारी सकाळी १०.२५ वाजता इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने त्यांनी नागपूरसाठी उड्डाण केले. नागपूर येथे दुपारी १२.१० वाजता पालकांसह नागपूरकरांनी स्वप्नील व श्रद्धाचे स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.