accident
accident

मोटार वाहन सुधारणा कायद्याने केला चमत्कार, अपघातांमध्ये सहा टक्‍क्‍यांनी घट

 नागपूर : पाच महिन्यांपूर्वी लोकसभेने मंजूर केलेल्या केंद्रीय मोटर वाहन सुधारणा कायदा फलदायी ठरू लागला असून महाराष्ट्रातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये सहा टक्‍क्‍यांनी घट झाल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
भविष्यात वाहतुक कशी नियंत्रित होणार आणि अपघातांचे प्रमाण कसे कमी होणार असा प्रश्न लोकसभेतील प्रश्‍नोत्तरांच्या तासात खासदारांनी विचारला होता. यावर गडकरी यांनी उपरोक्त माहिती दिली. सुधारित कायदा येण्यापूर्वी देशात 2016 मध्ये 1 लाख 50 हजार 75 मृत्यू अपघात झाले. 2017 मध्ये 1 लाख 47 हजार 913, 2018 मध्ये 1 लाख 51 हजार 417 जणांचे अपघातात मृत्यू झाले होते. नव्या कायद्यानंतर गुजरामध्ये अपघातातील मृत्यूचे प्रमाण 14 टक्के घटले, उत्तरप्रदेशात 13 टक्के, मणिपूर मध्ये 4 टक्के, जम्मू काश्‍मीरमध्ये 15 टक्के, आंध्रमध्ये 7 टक्के, चंडीगढमध्ये 15 टक्के, महाराष्ट्रात 6 टक्के, छत्तीसगडमध्ये 5 टक्के, हरियाणात 1 टक्का, दिल्लीत 2 टक्के अपघाताचे प्रमाण घटले. केरळ आणि आसाममध्ये मात्र हे प्रमाण वाढले. सरासरी काढली असता अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 10 टक्के कमी झाले आहे. हा सुधारणा कायदा मंजूर झाल्यानंतर आपण 15 हजार लोकांचा जीव वाचवू शकलो.
तसेच आता एज्युकेशन, रोड इंजिनीअरिंग, व्हेईकल इंजिनीअरिंग, इन्फोर्समेंट आणि आणिबाणीची स्थिती या 5 विषयांवर आमचा विभाग काम करीत आहे. त्याचेही चांगले परिणाम समोर येत आहेत. केंद्र शासनाने एक आदेश पारित करून अपघात रोखण्यासाठी एक समिती प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केली आहे. संबंधित मतदारसंघाचे खासदार या समितीचे अध्यक्ष असतील आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे सचिव असतील. ही समिती महामार्ग, जिल्हा मार्ग, राज्य शासनाचे मार्ग यावरील अपघात स्थळे तपासण्याचे काम करणार आहेत. माझ्या स्वत:च्या मतदारसंघात हे काम सुरू आहे. याशिवाय अभियांत्रिकी महाविद्यालय, आयआयटी, पॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थ्यांना 500 कि.मी.पर्यंतचे रस्ते तपासणीचे आणि अपघातात घट कशी होईल यासाठी रस्ता सुरक्षा ऑडिट करण्याचे काम देण्यात यावे. या विद्यार्थ्यांचा अहवाल आल्यानंतर त्यावर संबंधित एजन्सी उपाययोजना करेल. यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांना अनुदान देऊ.

स्वीडनमध्ये नुकत्याच झालेल्या एका रस्ता सुरक्षा परिषदेत भारतात अपघाती मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. अपघातग्रस्त स्थळे शोधून त्याचे निर्मूलन करण्याच्या दृष्टीने 14 हजार कोटींची योजना येत आहे. या योजनेअंतर्गत 7 हजार कोटी केंद्र शासन, साडेतीन हजार कोटी जागतिक बॅंक आणि साडेतीन हजार कोटी एडीबी कर्ज देणार आहे. जागतिक बॅंकेच्या सहकार्याने 24 टक्के अपघात कमी केल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com