esakal | जनावरांसाठी चारा अन् पिकांना खत देणारी एकच वनस्पती, 'अशी' करा लागवड
sakal

बोलून बातमी शोधा

azolla

जनावरांसाठी चारा अन् पिकांना खत देणारी एकच वनस्पती, 'अशी' करा लागवड

sakal_logo
By
राम वाडीभस्मे

धानला (नागपूर) : 'अझोला' (azolla) ही पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे. ‘अझोला कल्चर’द्वारे बेड तयार करून ही वनस्पती तयार होईल. एकाच वनस्पतीचा फायदा जनावरांसाठी पशूखाद्य व शेतात उत्तम खत (azzola benefits for farming) म्हणून करणे शक्य आहे. लागवडीचा (how to plant azolla) खर्च कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा दुहेरी फायदा होतो. (azolla plant benefits for animal and farming)

हेही वाचा: ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने दिली कोरोनाला मात; कधीही पडले नाही घराबाहेर

‘अझोला’मध्ये कॅल्शियम, फॉस्परस, पोटॅशियम, लोह, तांबे, मग्नेशियम हे उपयुक्त खनिज पदार्थ परिपूर्ण असतात. उच्च प्रथिने निम्न मात्रेत असल्याने जनावरांस सुलभतेने पचतात. अझोला घनआहारात मिसळून जनावरांना देऊ शकतो. जनावरांचा चारा गुणकारी व परिणामकारक बनविला जातो. ‘अझोला कल्चर’ हे तालुका कृषी विभागाकडे उपलब्ध आहे. कमी जागेत उत्पादन घेता येते. प्रकल्प सुरू करायला लागणारी गुंतवणूकही कमीच आहे. प्रकल्प उभारणी खर्च ३०० ते४०० रुपये प्रती खड्डा असून, हा खर्च फक्त एकदाच करावा लागतो. ही वनस्पती जनावरांना फायदेशीर आहे. दुग्ध उत्पादनात१५ते २० टक्के (अर्धा ते एक लीटर प्रति जनावर) वाढ होते. प्रचलित पशुखाद्यावरील खर्च २० ते२५ टक्क्यांनी कमी होतो. दुभत्या जनावरांसोबतच ही वनस्पती मांसल कोंबड्या तसेच अंडी देणाऱ्या कोंबड्यांनाही पुरवून उत्पादन वाढवू शकतो. याचबरोबर शेळ्या, मेंढया यांना पुरविल्यास त्यांच्याही उत्पादनात चांगली वाढ होते. मौदा तालुका कृषी विभागाच्या वतीने हा प्रकल्प राबविला जात आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना अझोला कल्चर हे मारोडी येथील रोपवाटीकेतून घेता येईल. तसेच अधिक माहिती सर्व कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे तालुका कृषी कार्यालयाने कळविले आहे.

हेही वाचा: आता घड्याळाद्वारेही शिंपडता येणार सॅनिटायजर, तरुणानं तयार केलीय 'रोल ऑन वॉच'

भातपिकांना (धान) फायदे -

अझोलामध्ये नत्र आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते जमिनीत टाकल्याने कुजते. त्यापासून उत्तम प्रतिचे सेंद्रिय खत तयार होते. जमिनीत रासायनिक खताची मात्रा कमी लागते व पिकाची वाढ जोमाने होते. हेक्टरी १० टन अझोला वापरल्यास धान पिकास २५ ते३० किलो नत्र प्रति हेक्टरी मिळते. सेंद्रिय खतामुळे जमिनीची पोत सुधारते तसेच धानाच्या उत्पादनात२० ते२५ टक्के वाढ होते.

अशी करावी लागवड -

जमिनीत २ मिटर लांबी, एक मिटर रुंदीचा व २० सेंमी खोल खड्डा तयार करावा. त्यात खतांच्या रिकाम्या पिशव्या झाकाव्यात. एक पातळ युव्ही स्टॅबिलाईझड प्लॅस्टिकची सीलपोलिन शिट पूर्ण खड्डा झाकेल, अशी टाकावी. या शिटवर१०ते १५ किलो बारीक माती टाकावी. दहा लीटर पाण्यात दोन किलो शेण व ३० ग्राम सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण करून ते मातीवर टाकावे. पाण्याची पातळी दहा सेंमीपर्यंत पोहोचेल एवढे पाणी टाकावे. या पाण्यात अर्धा ते एक किलो शुद्ध व ताजे अझोला कल्चर पसरवून त्यावर थोडे पाणी शिंपडावे. एक दोन आठवड्यात ५ ते २० सेंमी जाड अझोला सर्वत्र पसरते. २० ग्राम सुपर फॉस्फेट आणि एक किलो शेण ५५दिवसात मिसळवावे. त्यामुळे अझोलाची वाढ लवकर होते आणि रोजची ५०० ग्राम उपज कायम राहते.