Nagpur : मुलांकडूनच ज्येष्ठांची परवड; वृद्धाश्रमात वाढतेय संख्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur : मुलांकडूनच ज्येष्ठांची परवड; वृद्धाश्रमात वाढतेय संख्या

Nagpur : मुलांकडूनच ज्येष्ठांची परवड; वृद्धाश्रमात वाढतेय संख्या

नागपूर : तळहातावरील फोडाप्रमाणे लहानाचे मोठे केलेल्या मुलांना आता राजा-राणींच्या संसारात आई-वडील अडथळा ठरत असून अनेक जण वृद्ध जन्मदात्यांना थेट वृद्धाश्रमात किंवा वाऱ्यावर सोडून निघून जात आहेत. एवढेच नव्हे तर काही मुले घरातील ज्येष्ठांना चक्क मारहाण करतात किंवा उपाशी ठेवत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

हेही वाचा: 'मोदी सरकारला चीनकडून अपमानित व्हायला आवडते, त्याची सवय झालीय'

मूल झाल्यावर सर्वाधिक आनंद आईवडिलांना होतो. तेव्हापासूनच त्या बाळाच्या भविष्याची चिंता आईवडीलांना लागलेली असते. मुलाचे शिक्षण, त्याचे आरोग्य, मुलांचे पालन-पोषण हे सर्व कोणत्याही परिस्थितीत पालक करतात. त्याला स्वतःच्या पायावर उभे करतात. स्वतः उपाशी राहून मुलाचे चांगले भविष्य चिंतण्यासाठी आईवडील राबराब राबतात.

मुलांना नोकरी किंवा व्यवसाय थाटेपर्यंत त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतात. तोपर्यंत त्या मुलांना आपल्या आईवडिलांत देव दिसतो. परंतु, त्या मुलाचे लग्न झाले आणि सून एकादा का घरात आली तर तिला सासू-सासरे अडचण ठरतात. सून धान्याचे माप ओलांडून घरी आल्यानंतर सुनेला सर्वात जड म्हणजे पतीचे आईवडील वाटतात. त्यांना टोमणे मारणे, त्यांचा सतत अपमान करणे, त्यांच्यावर अत्याचार करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहे.

पतीकडे नेहमी तगादा लावते की तुमचे आईवडील आपल्या घरात नको. मुलगासुद्धा पत्नी, मुले आणि आपला सुखी संसार बघून आईवडीलांना घरातून बाहेर काढतात. त्यांना थेट वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला जातो तर काही जण थेट घराबाहेर काढून आपली जबाबदारी झटकतात. काही मुले-सुना तर वृद्धांना मारहाण करणे आणि उपाशी ठेवण्याचे प्रताप करतात.

हेही वाचा: अमेरिका T 20 वर्ल्ड कपचा यजमान; ICC च्या 8 स्पर्धा आणि 12 देशांची संपूर्ण यादी

कुटुंबात समतोल आणि सुसंवाद राहिलेला नाही. एकत्रित कुटुंबपद्धती जाऊन विभक्‍त पद्धती आली. आता ‘हम दो, हमारा एक’ अशा कुटुंबरचनेत वृद्धांना स्थान दिले जात नाही. वृद्धांसोबत राहण्याची आजकाल मानसिकताच राहिली नाही. वृद्धाश्रमामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त असून, ९० टक्‍के वृद्ध सुनांच्या त्रासाला कंटाळून किंवा त्यांनी दिलेल्या त्रासामुळे वृद्धाश्रमात आलेले आहेत. विशेष म्हणजे, समाजात उच्चभ्रू म्हणून वावरणारे, उच्चशिक्षित असणारेच त्यांच्या वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवीत आहेत.

ज्येष्ठ म्हणजे संस्कार केंद्र

भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांना सर्वाधिक मान-पान असतो. घरातील चालते-फिरते संस्कार केंद्र म्हणून ज्येष्ठांकडे पाहिल्या जाते. सध्या विशेषकरून शहरात फ्लॅट संस्कृती रूजत आहे. त्यामुळे पती-पत्नी आणि एक मूल असे कुटुंब मर्यादित झाले आहे. त्यामुळे अनेक मुलांना आई-वडिल म्हणजे भार वाटतो.

हेही वाचा: 'राहुल गांधी ट्विट करतात अन् लगेच महाराष्ट्रात मोर्चा कसा निघतो?'

"उतारवयात जेव्हा आधार हवा असतो तेव्हाच ज्येष्ठांची परवड होते. त्यांना मान-पान तर सोडाच साधा ओलावाही मिळत नाही. आईवडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७, आणि नियम २०१० हा कायदा पास झालेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना गांभीर्य दाखवून ज्येष्ठांच्या बैठका घ्याव्यात आणि पोलिस आयुक्तांनी वृद्धांच्या तक्रारींना प्राधान्य द्यावे."

- हुकुमचंद मिश्रीकोटकर (अध्यक्ष, सहकारनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, नागपूर)

"आज मुलगा आणि सून वृद्ध आई-वडिलांना त्रास देतात. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे की काही वर्षानंतर तुम्हीसुद्धा म्हातारे होणार आहात. त्यामुळे स्वतःही त्यांना प्रेम द्या आणि आपुलकी लावा. मुलांनाही तेच शिक्षण द्या."

- निळकंठ पावणे (ज्येष्ठ नागरिक)

loading image
go to top