esakal | "संधी हुकलीय, पण शिकलोय खूप"; आयपीएल स्टार दर्शन नळकांडेच्या भावना
sakal

बोलून बातमी शोधा

Learn lots of things in IPL said Darshan Nalkande from Nagpur

आयपीएलमधील अनुभव 'सकाळ' शी शेअर करताना दर्शन म्हणाला, माझ्यासारख्या नवोदितांसाठी आयपीएल हे फार मोठे व्यासपीठ आहे. मुळात स्पर्धेसाठी निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे

"संधी हुकलीय, पण शिकलोय खूप"; आयपीएल स्टार दर्शन नळकांडेच्या भावना

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : आयपीएलसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूचे खेळण्याचे स्वप्न असते. मीदेखील याच अपेक्षेने दुबईला गेलो होतो. दुर्दैवाने यावेळीसुद्धा मला अकरामध्ये स्थान मिळू शकले नाही. स्पर्धेत एकही सामना खेळायला मिळाले नाही, याचे निश्चितच दुःख झाले. परंतु दोन-अडीच महिन्यांच्या काळात मी सिनिअर्सकडून जे काही शिकलो, त्याचा मला भविष्यात खूप फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणारा विदर्भाचा अष्टपैलू क्रिकेटपटू दर्शन नळकांडेने व्यक्त केली.

आयपीएलमधील अनुभव 'सकाळ' शी शेअर करताना दर्शन म्हणाला, माझ्यासारख्या नवोदितांसाठी आयपीएल हे फार मोठे व्यासपीठ आहे. मुळात स्पर्धेसाठी निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. गतवर्षी बेंचवर बसून राहावे लागल्यानंतर यावेळी तरी खेळण्याची संधी मिळेल, अशी आशा होती. दुर्दैवाने अकरामध्ये स्थान मिळू शकले नाही. त्यामुळे थोडेफार दुःख अवश्य झाले. 

जाणून घ्या - युवकाला पडले रातोरात श्रीमंत झाल्याचे स्वप्न; सकाळी कोंबडा आरवताच केला आत्महत्येचा प्रयत्न 

परंतु बाहेर राहूनही मला खूप काही शिकायला मिळाले. संयुक्‍त अरब अमिरातमधील दोन -अडीच महिन्यांच्या वास्तव्यादरम्यान मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे, वसीम जाफरसह संघातील महंमद शमी, ख्रिस जॉर्डनसारख्या अनुभवी गोलंदाजांनी माझ्यासह अनेक युवा खेळाडूंना वेळोवेळी मार्गदर्शन केले. नेट प्रॅक्टिसदरम्यान त्यांनी दिलेल्या टिप्स खूप मोलाच्या ठरल्या. त्यामुळे माझ्या खेळात निश्चितच खूप सुधारणा होणार आहे. 

उल्लेखनीय म्हणजे आयपीएलदरम्यान आंतरराष्ट्रीय सामन्यांचे दडपण किंवा 'मॅच टेंपरामेंट' काय असते, हे मला जवळून पहायला आणि अनुभवायला मिळाले. त्यामुळे येथील अनुभवाची शिदोरी मला भविष्यात नक्कीच कामी येणार आहे.

आयपीएलनंतर २१ वर्षीय दर्शनने आपले लक्ष आता जानेवारीमध्ये सुरू होणाऱ्या घरगुती सीझनवर केंद्रित केले आहे. दर्शन म्हणाला, विदर्भाकडून यावर्षी पुन्हा संधी मिळाल्यास नक्कीच चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. गेल्या मोसमात उत्कृष्ट प्रदर्शन केल्यानंतर माझ्याकडून अपेक्षा वाढल्या असल्या तरी, त्याचे मी अजिबात दडपण घेणार नाही. 

प्रत्येक सामन्यात शंभर टक्के योगदान देऊन विदर्भाला विजय मिळवून देण्यावर माझा प्रामुख्याने भर राहणार आहे. मागील वर्षीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा किंवा त्याहून अधिक चांगले प्रदर्शन करण्याचा माझा यावेळी प्रयत्न राहणार आहे. मी एक अष्टपैलू खेळाडू आल्यामुळे मला इतरांपेक्षा नेहमीच अधिक स्टॅमिना लागतो. त्यामुळे फिटनेस कायम ठेवण्यासाठीही मला दुप्पट मेहनत घ्यावी लागणार आहे.

सविस्तर वाचा - शेतमजूर असलेल्या दिलीपची ही संपत्ती पाहून व्हाल थक्क; संग्रहात आहेत तब्बल ५० हजार अमूल्य वस्तू 

टीम इंडियात स्थान मिळविण्याचे स्वप्न

गेल्या वर्षी घरगुती सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणाऱ्या दर्शनला क्रिकेटच्या तिन्ही "फॉर्मट'मध्ये आपली उपयुक्‍तता सिद्‌ध करून दाखवायची आहे. वनडे, टी-20 सोबतच चारदिवसीय सामन्यांमध्ये अष्टपैलू प्रदर्शनाच्या जोरावर भविष्यात भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविण्याचे स्वप्न असल्याचे दर्शनने बोलून दाखविले. २०१८-१९ मध्ये महाराष्ट्राविरुद्‌ध रणजी पदार्पण करणाऱ्या दर्शनने गतवर्षी सैयद मुश्‍ताक अली टी-२० स्पर्धेत विदर्भाकडून सर्वाधिक १६ बळी टिपून देशात चौथे स्थान पटकाविले होते. शिवाय विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत आठ विकेट्‌स, २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेत २२ विकेट्‌स व २२० धावा, पाच वनडेत ११ विकेट्‌स आणि केरळविरुद्‌धच्या रणजी सामन्यात ६५ धावा फटकावून आपले अष्टपैलूत्व सिद्‌ध केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image