
Maha Metro : महामेट्रो भाड्याने देणार दोन लाख चौरस फूट जागा
नागपूर : महामेट्रोने सर्वच स्टेशनवर वाणिज्यिक कारणासाठी दुकाने, हॉलसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागा व्यापारी, व्यावसायिकांना भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध स्टेशनवरील एकूण दोन लाख १५ हजार चौरस फूट जागा भाड्याने देण्यासाठी महामेट्रोने व्यावसायिक, व्यापाऱ्यांना साद घातली असून येत्या ९ व १० मार्चला त्यांच्यापुढे सादरीकरण करण्यात येणार आहे.
महामेट्रोने तिकिट विक्रीशिवायही महसुलावर लक्ष्य केंद्रित केले आहे. यापूर्वीच विविध स्टेशनवरील मोकळी जागा विविध प्रतिष्ठानांना भाड्याने दिली आहे. सद्यस्थितीत महामेट्रोकडे लहान आकाराच्या १०८ जागा तर मोठ्या आकाराच्या ४० जागा आहेत.
मोठ्या आकाराच्या ४० जागा १ लाख ६३ हजार चौरस फुटात आहे तर लहान जागा ५२ हजार ४०० चौरस फुटात असून भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. या जागांबाबत माहिती देण्यासाठी महामेट्रोने दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित केला आहे.
यात मेट्रो स्थानकावरील व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या जागेबाबत सादरीकरण केले जाणार आहे. महामेट्रोचे मालमत्ता विभागाचे अधिकारी यावेळी व्यापारी, व्यावसायिकांना जागेबाबत माहिती देतील. याशिवाय जागेची प्रत्यक्ष पाहणीही करता येईल. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी व्यापारी आणि व्यावसायिक समुदायाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन महामेट्रोने केले आहे.
नोंदणी प्रक्रिया सुरू
मेट्रो स्टेशनवरील जागा व्यवसाय, व्यापारासाठी भाड्याने घेण्यास इच्छुक असलेल्यांना महामेट्रोने नोंदणी करण्याचे आवाहन केले. आजपासून नोंदणी सुरू करण्यात आली. इच्छुकांना छापील अर्ज भरून द्यावा लागणार आहे.
छापील अर्ज मेट्रो स्टेशनवर उपलब्ध आहे. हा अर्ज ७४१०००४३२१ या क्रमांकावर व्हॉट्स अपही करता येणार आहे. इच्छुकांनी नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, व्यवसायाची माहिती अर्जात भरून द्यावी किंवा व्हॉट्स अपवर पाठवावी, असे आवाहन महामेट्रोने केले आहे.