esakal | नागपूरकरांना दिलासा! जम्बो सिलेंडरसह ६१.५ मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन होणार उपलब्ध
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen cylender

दिलासा! जम्बो सिलेंडरसह ६१.५ मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन होणार उपलब्ध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्ह्यातील सर्व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व अविरत मिळण्यासाठी ऑक्सिजन पुरवठ्याचे जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय व खासगी डेडिकेटेड ११ कोविड हॉस्पिटल यांना ६१.५ मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन तर खासगी १७० रुग्णालयांना सुमारे ८ हजार ६२२ जम्बो सिलेंडर उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.

हेही वाचा: हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची भटकंती, प्लेसमेंटचा आकडा अडीच हजाराहून ९९ वर

कोविड रुग्णांना ऑक्सिजन अभावी उपचारामध्ये बाधा निर्माण होणार नाही यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ऑक्सिजन निर्माते, वितरक, शासकीय व खासगी कोविड हॉस्पिटलचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली. यापुढे सर्व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा निश्चित केला असून त्यानुसार वितरणाचे धोरण जाहीर केले आहे. याबैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त पी. एम. बल्लाळ, सतीश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: वऱ्हाडींनो लग्नात जाताय? मग लसीकरण आणि आरटीपीसीआर चाचणी आवश्‍यक

जिल्ह्यात तसेच शहरात कोविडने संक्रमित रुग्णांवर उपचार करण्यासाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, कोविड हेल्थ सेंटर तसेच खासगी रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे. या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व अविरत असणे अत्यंत गरजेचे आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये अपुरे ऑक्सिजनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ऑक्सिजन वितरणाचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांसाठी ऑक्सिजन साठा, सिलेंडरचे वितरण रिफिल, डिस्टीब्यूटर यांच्यामार्फत पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. शहर व ग्रामीण भागातील १७० रुग्णालयांना ६ हजार ८२२ जम्बो सिलेंडरमार्फत ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संबंधित रुग्णालयांनी त्यांना निश्चित केलेल्या वितरकांकडून ऑक्सिजनचा पुरवठा प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

हेही वाचा: १५ दिवसांत तब्बल ३४ मृत्यू! गावात स्मशान शांतता

तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष -

ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात हॉस्पिटलनिहाय नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनानुसार वितरकांकडून थेट रुग्णालयांना पुरवठा होणार आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात असलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी महानगरपालिका क्षेत्र व ग्रामीण भागासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रासाठी नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६७०२१ तर ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६२६६८ आजपासून कार्यान्वित झाले आहे.