शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रेल्वेस्थानकावर आंदोलन; आंदोलक आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये झटापट

Nagpur
Nagpur

नागपूर ः कृषी कायद्यांविरोधात देशभरात शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्या अंतर्गत गुरुवारी देशाच्या विविध भागांमध्ये ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात आले. नागपूर रेल्वेस्थानकासमोरही संयुक्त किसान मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. रेल्वे अडविण्यासाठी पुढे सरसावलेल्या आंदोलकांना सुरक्षा यंत्रणांनी रोखून धरले. यावेळी दोन्हीकडून चांगलीच झटापट झाली.

संयुक्त किसान मोर्चाने दुपारी १२ ते ४ दरम्यान रेल रोकोची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिसांना पूर्वीच सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दुपारपूर्वीच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि लोहमार्ग पोलिसांना नागपूर रेल्वे स्थानकासमोर मोठ्या संख्येने नियुक्त करण्यात आले होते. अजनी, इतवारी स्थानकावरही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय मनीषनगर क्रासिंगपासून नरेंद्रनगर पूल, लोखंडीपूल, नागपूर स्टेशन आउटर, गुरुद्वारा, मंगळवारी आरओबी, कोराडी रोड क्रॉसिंगसह गोधनीपर्यंत लक्ष ठेवण्यात आले होते. 

दुपारी १२ वाजताच्या सुमारास अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र किसान सभा व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर एकत्र आले. केंद्र सरकार व तिन्ही कृषीकायद्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. हमीभावाचा कायदा करा, शेतकऱ्यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्याक आली. घोषणा सुरू असतानाच आंदोलकांनी अचानक रेल्वे स्थानकाच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला. 

आधीच सज्ज असलेले पोलिस कर्मचारी व रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी दंडे समोर धरून आंदोलकांना रोखले. आंदोलक व सुरक्षा यंत्रणांमध्ये झटापट झाली. काही वेळाने आंदोलक पुन्हा आपल्या जागेवर परतले आणि पुन्हा घोषणा सुरू केल्या.रेल्वेचे खासगीकरण रद्द करा, कामगार विरोधीकायदे मागे घेण्याची मागणीही यावेली करण्यात आली.

रसंयुक्त किसान मोर्चाचे अरूण वनकर यांनी केंद्राने संमत केलेले तिन्हा कृषी कायदे शेतकरी विरोधी असून ते तत्काळ मागे घेण्याची मागणी केली. केंद्र सरकार भांडवलदारांच्या हितासाठीच हे कायदे लादू पाहत आहेत. शेतकऱ्यांना नको असलेले कायदे केंद्राने तातडीने मागे घ्यावे, अन्यथा आंदोलन सुरूच राहील. येणाऱ्या दिवसांमध्ये आंदोलनाची व्याप्ती आणखीच वाढलेली दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com