टार्गेट २०२१: देशात अव्वल स्थान पटकावून दाखवणार'; आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू रितिका ठक्करचा निर्धार

Target 2021 will be on number one position in world said Ritika thakkar
Target 2021 will be on number one position in world said Ritika thakkar

नागपूर : कोरोना व त्यानंतर लागलेल्या लॉकडाउनमुळे प्रचंड त्रास झाला. चार-पाच महिने कोर्टवरच जाता आले नाही. त्यामुळे घरीच फिटनेस करून दुधाची तहान ताकावर भागवावी लागली. आता नियमित प्रॅक्टिस सुरू झाल्याने २०२१ मधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दुहेरीत जास्तीतजास्त विजेतीपदे मिळविण्यासोबतच, देशात अव्वल स्थान पटकावण्याचा निर्धार नागपूरची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू रितिका ठक्करने व्यक्त केला आहे.

शहरातील इतर खेळाडूंप्रमाणे रितिकालाही कोरोनाचा जबर फटका बसला. रितिका म्हणाली, मार्चमध्ये लॉकडाउन लागल्यानंतर सुरुवातीला घराबाहेर पडता आले नाही. त्यामुळे घरीच फिटनेस करावा लागला. सरांनी दिलेल्या शेड्युलनुसार स्कीपिंग, स्ट्रेचिंग, योगा व मेडिटेशन करून स्वतःला तंदुरुस्त ठेवत होती. बॅडमिंटन कोर्टवर जाणं बंद झाल्याने स्पर्धा व प्रॅक्टिसचे व्हिडिओ पाहून त्याद्वारे शिकण्याचा प्रयत्न करीत होती. गेल्या चार-पाच महिन्यांत सरावासोबतच स्पर्धाही न झाल्याने मी आणि माझ्या पार्टनरला (सिमरन सिंघी) एकत्र प्रॅक्टिसच करता आली नाही. त्यामुळे निश्चितच फरक पडणार आहे. कोरोनाकाळात स्पर्धा होऊ न शकल्याचेही दुःख आहे. उशिरा का होईना नियमित सराव सुरू झाल्याने हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत आहे, जे खेळाडूंसाठी शुभसंकेत आहे.

भविष्यातील स्पर्धा व टार्गेटबद्दल विचारले असता रितिका म्हणाली, भारतीय बॅडमिंटन संघटनेने अद्याप कॅलेंडर जाहीर केले नाही. कोरोनामुळे स्पर्धा केव्हा होईल, याबद्दल ठामपणे सांगू शकत नाही. पण आमची तयारी आहे. येत्या काळात स्पर्धा सुरू होतील, अशी आशा करायला हरकत नाही. १९ वर्षीय रितिकाला २०२१ मध्ये जास्तीतजास्त स्पर्धा जिंकून आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करायची आहे. दुहेरीत देशात नंबर वन बनण्यासोबतच जागतिक क्रमवारीत पहिल्या पन्नासमध्ये स्थान मिळवायचे आहे. त्यासाठी कोरोनाचे संकट लवकर जाणे आवश्यक आहे. रितिकाचे २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न असून, मुंबईकर सिमरनच्या मदतीने देशाला पदक मिळवून द्यायचे आहे.

अजय दयाल व रॉबिन सायमन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारी रितिका व सिमरन या 'चॅम्पियन' जोडीने आतापर्यंत सबज्युनिअर, ज्युनिअर व सिनियर गटातील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक विजेतीपदे जिंकलेली आहेत. यात आयव्हरी कोस्ट, इजिप्त व मॉरिशसमधील चार अजिंक्यपदाचा मुख्यत्वे समावेश आहे. याशिवाय त्यांनी तीनवेळा राष्ट्रीय ज्युनिअर व सबज्युनिअर स्पर्धांमध्ये उपविजेतेपद व वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. उल्लेखनीय म्हणजे, रितिका व सिमरन सलग पाच वर्षांपासून राज्य स्पर्धांमध्ये 'चॅम्पियन' आहेत.

' सरत्या वर्षात कुणीही कोरोनासारख्या भयंकर संकटाची अपेक्षा केली नव्हती. प्रत्येकाने या अनाहूत संकटाला धैर्याने तोंड दिले. झाले गेले सर्व विसरून आता नव्या उमेदीने मी कोर्टवर उतरून आपले स्वप्न साकार करणार आहे.'
-रितिका ठक्कर, 
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com