esakal | या शहरातही घडले होते पालघरसारखे हत्याकांड
sakal

बोलून बातमी शोधा

There were massacres like Palghar in Nagpur city

नागपूर व कळमना सारखेच प्रकरण धुळे व राईनपाडा येथे नाथपंथी डवरी समाजाच्या पाच भिक्षुकांना जमावाने ठेचून मारले होते. पालघर येथे चालकासह पुजारी आणि महंतांची हत्या हा तर जमावाच्या विकृत आणि हिंसक मानसिकतेचा कळसच आहे, या शब्दात योगेश बन यांनी तीव्र निषेध नोदविला.

या शहरातही घडले होते पालघरसारखे हत्याकांड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर :  दशनाम गोसावी समाज हा भिक्षा मागून दीक्षा देणारा समाज आहे. अनेक मठ आणि मंदिरांमध्ये दशनाम गोसावी समाजाचे पुजारी आहेत. दशनाम गोसावी समाजाच्या पुजाऱ्यांना गुरुस्थानी मानण्यात येते. अत्यंत धार्मिक वृत्तीची ही माणसं आहेत. त्यातील महंत आणि पुजाऱ्यांची जमावाकडून हत्या होणे, ही पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे. अशीच एक घटना नागपूर व कळमना येथे घडली होती. नाथजोगी समाजाच्या तिघांना जमावाने ठेचून मारले होते. पालघर येथील घटनेमुळे ही घटना पुन्हा चर्चेत आली आहे. 

महाराष्ट्राला शाहू, फुले, आंबेडकर यांची अत्यंत उज्ज्वल पुरोगामी परंपरा आहे. या महाराष्ट्रात अशी घटना घडणे अत्यंत लज्जास्पद आहे. दशनाम गोसावी समाज हा भटक्‍या-विमुक्त जाती-जमातीमध्ये येतो. महंत आणि संतांना कोणतीही जात नसते. परंतु, या समाजासाठी हे पुजारी, संत, महंत अत्यंत पुजनीय असतात. यापूर्वीही महाराष्ट्रामध्ये भटक्‍या विमुक्तांच्या लोकांना जमावाने ठेचून मारण्याच्या दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो, असे संतापजनक मत अखिल भारतीय दशनाम गोस्वामी समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश बन यांनी व्यक्त केले. 

ठळक बातमी - साक्षगंध झाल्यानंतर भावी पतीच्या दबावात ठेऊ दिले 'तसे' संबंध; लग्नाची तारीख काढताना केली ही मागणी...

नागपूर व कळमना सारखेच प्रकरण धुळे व राईनपाडा येथे नाथपंथी डवरी समाजाच्या पाच भिक्षुकांना जमावाने ठेचून मारले होते. पालघर येथे चालकासह पुजारी आणि महंतांची हत्या हा तर जमावाच्या विकृत आणि हिंसक मानसिकतेचा कळसच आहे, या शब्दात योगेश बन यांनी तीव्र निषेध नोदविला. भारत आणि नेपाळमध्ये दशनाम गोसावी समाज प्रामुख्याने वास्तव्यास आहेत. भारतात विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि पश्‍चिम बंगालमध्ये या समाजाची मोठी संख्या आहे. 

काय होते हे हत्याकांड?

शहरातील कळमना परिसरातील ही घटना आहे 2012 सालची. या परिसरातील कळमना, लकडगंज, यशोदानगर आदी परिसरात विचित्र अफवा पसरली होती. अंगाला ग्रीस, तेल चोपडलेले किंवा साडी-चोळी घातलेले काही गुंड रात्रीच्या अंधारात येतात आणि महिला-मुलींची छेडकाढतात. त्यांच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करतात. अशी जोरदार अफवा पसरल्यामुले या भागातील महिला आणि मुलींमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. आपल्या वस्तीत किंवा आपल्या घरात असा कुणीही गुंड प्रवृत्तीचा माणूस शिरू नये, यासाठी या परिसरातील नागरिक रात्र-रात्र जागून काढत होते. पोलिसांत वारंवार तक्रार करूनही अफवांचे निराकरण करण्यात आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात पोलिस अपयशी ठरले होते. परिणामी लोकांमध्ये प्रचंड असंतोष वाढला होता.

हेही वाचा - Video : 'जास्त वेळ थांबू नको, पटकन पैसे दे अन्‌ निघ लवकर', मग घडला हा प्रकार...

अशाच काळात 9 मे 2012 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास साड्या-चोळ्या घातलेले चार पुरूष कळमना भागातील नेताजीनगर परिसरात शिरले. लोकांमध्ये आधीच दहशत असल्यामुळे लोक मागावरच होते. एका घरात एकटीच महिला होती. साडी-चोळी घातलेले हे पुरूष आपल्या घरात येत आहेत, हे पाहून ती महिला ओरडली. त्यामुळे हे साडी-चोळी घातलेले पुरूष वाट मिळेल तिकडे पळत सुटले. परंतु आरडाओरड ऐकताच लोकधडाधडा गोळा झाले. छेडकाढणारे हेच ते गुंड होय, हे समजून लोक संतापले. मग सारा जमाव हिंस्त्र झाला आणि मिळेल त्या वस्तू हातात घेतल्या. लाठ्या, काठ्या, लोखंडी रॉड आणि दगड-वीटाही घेतल्या. चारही लोकांवर तुटून पडले. जमाव निर्दयी झाला. यात चौघांपेकी तिघे ठार झाले. 

कोण होते तेतिघे?

जमावाने ठार केलेले हे तिघेही लोक भटक्‍या-विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातील नाथजोगी समाजाचे होते. सुपडा मगन नागनाथ, हसन दादाराव सोळंकी आणि पंजाबराव भिकाजी शिंदे अशी त्यांची नावे.ते बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद तालुक्‍यातील मोहदेपूर येथील रहिवाशी होते. वेगवेगळे सोंग घेत भिक्षा मागून मिळेल त्या पैशात पोट भरायचे असा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. अफवा पसरलेल्या काळातच ते नागपूर येथीलकळमना परिसरात गेले आणि संतप्त जमावाच्या तावडीत सापडले. त्यात ते गतप्राण झाले. 

अधिक माहितीसाठी - प्रेयसी दुसऱ्यासोबत सेट झाल्याने टिकटॉकवर टाकले दर्दभरे व्हिडिओ अन्

भिक्षा मागून त्यावर उपजीविकेचे काम

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत या समाजाचे लोक राहतात. सतत भटकंती करून भगवी वस्त्र परिधान करून भिक्षा मागून त्यावर उपजीविकेचे काम हा समाज करायचा. शिक्षणामुळे त्यांच्याच मोठा बदल होत आहे. देशपातळीवर समाज संघटित असल्यामुळे विकासाच्या मार्गाने निघाला आहे. यातील दोषी पोलिसांचे केवळ निलंबन न करता, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या हत्याकांडाची "सीबीआय'च्या माध्यमातून लवकरात लवकर चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीही योगेश बन यांनी समाजाच्या वतीने केली. 

"सकाळ'ने घेतली होती गोलमेज परिषद

दशनाम गोसावी समाजाच्या राष्ट्रीय पातळीवरील गोलमेज परिषदेचे आयोजन "सकाळ' आणि गोसावी समाज संघटेच्या वतीने नागपूर येथील रविभवनात 14 सप्टेंबर 2019 रोजी केले होते. अखिल भारतीय गोस्वामी समाज सभा दिल्लीचे महामंत्री ए. जी. गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली आणि महंत प्रीतम पुरी, श्री. शंकराचार्य दशनाम गोस्वामी आखाडा दिल्लीचे राष्ट्रीय अद्यक्ष नानकचंद गिरी, समाजाचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश बन यांच्यासह देशातील सर्वच राज्यातील संत, महंत, सामाजिक कार्यकर्ते गोलमेज परिषदेला उपस्थित होते. दशनाम गोसावी समाजाला "मोस्ट बॅकवर्ड क्‍लास'चा दर्जा देण्यात यावा, अशी मागणीही या परिषदेतून केली होती.