esakal | वाघाच्या शिकाऱ्याला दया दाखवली जाऊच शकत नाही; न्यायमूर्तींचं मत; फेटाळली आरोपाची याचिका 
sakal

बोलून बातमी शोधा

Will not show mercy to man who did Hunting of Tiger  said Nagpur High Court

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे व पुष्पा गणेडीवाला यांनी मध्य प्रदेशातील कुख्यात शिकारी कुट्टू ऊर्फ राहुल पारधी याची याचिका फेटाळताना स्पष्ट केले.

वाघाच्या शिकाऱ्याला दया दाखवली जाऊच शकत नाही; न्यायमूर्तींचं मत; फेटाळली आरोपाची याचिका 

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : जंगलातील गाभा क्षेत्रात शिरून वाघाची शिकार करणाऱ्या गुन्हेगारावर कोणत्याही प्रकारची दया दाखवली जाऊ शकत नाही. अशा गुन्हेगारांना धडा शिकवला जातो. त्यांना कठोर शिक्षा केली जाते हा संदेश समाजामध्ये जाणे आवश्यक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे व पुष्पा गणेडीवाला यांनी मध्य प्रदेशातील कुख्यात शिकारी कुट्टू ऊर्फ राहुल पारधी याची याचिका फेटाळताना स्पष्ट केले.

पारधीला वन्यजीव व वन कायद्यांतर्गतच्या तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे. त्याला १८ एप्रिल २०१७ रोजी पवनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास, ५ मे २०१७ रोजी देसाईगंज प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास, तर १० ऑक्टोबर २०१७ रोजी तुमसर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ३ वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. 

जाणून घ्या -  'तिच्या' घरी सुरु होती लग्नाची लगबग पाहुणेही होते तयार; तेवढ्यात आला फोन अन् एका क्षणात सगळंच संपलं 

या तिन्ही शिक्षा एकत्र भोगण्याचा आदेश मिळविण्यासाठी त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने पारधीचे गंभीर गुन्हे लक्षात घेता त्याला दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे पारधीला पूर्ण ९ वर्षे कारावास भोगावा लागेल. त्याने आतापर्यंत सहा वर्षे शिक्षा भोगली आहे.

पारधीचे कुख्यात शिकारी संसारचंदसोबत संबंध आहेत. तो वाघाची शिकार करणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य आहे. ही टोळी मध्य भारतात कार्यरत आहे. त्याला गुन्हे करण्याची सवय आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर तो कारागृहातून पळून गेला होता. त्याला पकडून आणण्यासाठी पोलिसांना एक वर्ष परिश्रम घ्यावे लागले. त्याच्यावर एक लाख रुपयाचे इनाम घोषित करण्यात आले होते. सरकारने अशा गुन्हेगारांमुळे देशात वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

नक्की वाचा - अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घराचं शेजाऱ्यांनी उघडलं दार; पलंगाजवळील दृश्य बघून भल्याभल्यांचा उडाला थरकाप 

माणसाविरुद्धचे गुन्हे तत्काळ पुढे येतात व त्या गुन्ह्यांचा शोधही लागतो. परंतु, घनदाट वनामध्ये वन्यजीवांविरुद्ध घडणारे गुन्हे सहज पुढे येत नाहीत आणि त्याचा शोध घेणेही फार कठीण असते. परिणामी, पारधीने संबंधित तीन गुन्ह्यांशिवाय आणखी किती गुन्हे केले असतील, किती वाघ व इतर वन्यप्राण्यांची शिकार केली असेल हे सांगता येणार नाही. त्याने संबंधित तीन गुन्हे वेगवेगळ्या ठिकाणी केले आहेत. त्यावरून त्याच्या गुन्हेगारीवृत्तीची व्यापकता सिद्ध होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image