मोठी बातमी! गडचिरोलीहून लाहेरीला जाणाऱ्या बसला नक्षल्यांनी अडवले; भारत बंद ठेवण्याचे आवाहन करणारे बांधले बॅनर 

मिलिंद उमरे 
Thursday, 26 November 2020

वाहकासह प्रवाशांना खाली उतरवून परत जाण्यास सांगितले. तसेच या परिसरात 26 नोव्हेंबरला भारत बंद ठेवण्याचे आवाहन करणारे बॅनर बांधून पत्रकेही टाकली.

भामरागड (जि. गडचिरोली) : गडचिरोली येथून लाहेरी जाणाऱ्या बसला भामरागड तालुकास्थळापासून जवळपास 12 किमी अंतरावर लाहेरी मार्गावरील हिंदेवाडा परिसरात झाडे पाडून नक्षलवाद्यांनी अडवले. त्यानंतर बसमधील वाहनचालक, वाहकासह प्रवाशांना खाली उतरवून परत जाण्यास सांगितले. तसेच या परिसरात 26 नोव्हेंबरला भारत बंद ठेवण्याचे आवाहन करणारे बॅनर बांधून पत्रकेही टाकली.

हेही वाचा - बाबा आमटेंच्या आनंदवनमधील वादाला कुठून झाली सुरुवात, नेमके काय आहे प्रकरण? 

प्राप्त माहितीनुसार गडचिरोली येथून लाहेरी जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस बुधवारी (ता. 25) लाहेरी येथे मुक्‍कामी जाणार होती. दरम्यान नक्षल्यांनी भामरागड-लाहेरी मार्गावर हिंदेवाडाजवळ झाडे पाडून रस्ता अडवला. चालकाने बस भामरागडकडे आणत असताना पुन्हा एक झाड पाडून नक्षल्यांनी मार्ग अडवला. 

चालक, वाहकासह सर्व प्रवाशांना पायी भामरागडला पाठविले. हे सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच घटनास्थळी नक्षली बॅनर तसेच पत्रके आढळले आहेत. येथे बांधलेल्या बॅनरमध्ये 26 नोव्हेंबरला भारत बंद पुकारण्यात आला असून सर्वांनी बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सविस्तर वाचा - ऐटीत खरेदी करायला गेला पोलिसांची वर्दी; दुकानदाराला आला संशय आणि घडली जेलवारी

नक्षल्यांकडून मोठा घातपात करण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. अधिक तपास गडचिरोली पोलिस करीत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naxalites stopped bus from gadchiroli to Laheri