यवतमाळमध्ये लॉकडाउनच्या नियमांमध्ये दिलासादायक बदल; वाचा काय राहील सुरु आणि काय बंद 

new rules and regulations for lockdown in yavatmal
new rules and regulations for lockdown in yavatmal

यवतमाळ : राज्यात कोरोना विषाणुमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने टाळेबंदीची मुदत दिनांक 30 सप्टेंबर 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत वाढविलेली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी यवतमाळ जिल्ह्याकरीतासुध्दा टाळेबंदीची मुदत आता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविण्याचे व सुधारीत मार्गदर्शक सुचना लागू केल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात खालील बाबी या प्रतिबंधीत राहतील. सर्व शाळा, महविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग इत्यादी बंद राहतील. तथापी ऑनलाईन आंतरशिक्षणास मुभा राहील. सर्व सिनेमा हॉल, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्ली हॉल व इतर तत्सम ठिकाणे बंद राहतील.  सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतीक, धार्मिक कार्य, इतर मेळावे आणि मोठ्या धार्मिक कार्यक्रमांवर पुर्णपणे बंदी राहील. 

लग्न समारंभाच्या कार्यक्रमास वेगळ्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. तथापि लग्न 50 व्यक्तीच्या मर्यादेत सामाजिक अंतर तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करण्याच्या अटीवर सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधीत पार पाडणे आवश्यक राहील. अंत्यविधी प्रसंगी 20 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाही व सामाजिक अंतराचे पालन करावे लागेल. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू इत्यादीच्या वापरास बंदी राहील. 

सर्व दुकाने, बाजारपेठ सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु गर्दी वाढल्यास किंवा सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत नसल्याचे दिसून आल्यास बाजारपेठ व दुकाने बंद करण्याबाबतचे आदेश काढण्यात येतील असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतूकीस टु व्हिलर- 1+1 व्यक्ती, थ्री व्हिलर 1+2 व्यक्ती, फोर व्हिलर 1+3 व्यक्ती या आसनक्षमतेसह मुभा राहील मुभा राहील.  वाहन चालक व प्रवासी यांना मास्क वापरणे बंधनकारक राहील. 

दुध विक्री, कृषी साहित्य, रासायनिक खत वक्री, बि-बियाणे विक्री व त्यांचे गोदामे, दुकाने, पेट्रोलपंप, ई-कॉमर्स सेवा, शहरी भागात सुरू असलेली बांधकामे, शासकीय बांधकामे व मान्सुनपूर्व कामे व इतर खाजगी बांधकामे, कुरिअर व पोस्टल सेवा, ईलेक्ट्रीशिअन व प्लंबर सेवा सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच बार्बर शॉप्स्‍ा, स्पॉस, सलुन, ब्युटी पार्लर देखील शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

मेडीकल औषधी दुकाने, दवाखाने, पशुवैद्यकीय चिकित्सालये व औषधी दुकाने, वैद्यकीय आपत्कालीन सेवेची वाहतूक 24X7 सुरु राहतील. सर्व शासकीय कार्यालये वर्ग एक व दोन चे अधिकारी 100 टक्के उपस्थित राहतील. मात्र वर्ग तीन व चारचे 50 कर्मचारी वा 50 टक्के कर्मचारी यापैकी जी जास्त असेल त्या संख्येने शासकीय कार्यालयीन वेळेनुसार उपस्थित राहतील. कृषी विषयक कामे व सेवा जसे ट्रॅक्टर, जेसीबी मशीन, बोअरवेल मशीन इत्यादी सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहतील. 

शेतीच्या पेरणी, मशागतीस संपुर्ण शेतीच्या कामास मुभा राहील. बँक व वित्तीय संस्था त्यांचे कार्यालयीने वेळेनुसार सुरू राहतील. तसेच ग्राहकांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 4 अशी वेळ राहील. एलपीजी गॅस चे कार्यालय सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहील तर घरपोच सिलेंडर पोहचविणे 24X7 सुरु राहील.

हॉटेल व लॉजेस 100 टक्के क्षमतेनुसार दिनांक 2 सप्टेंबर 2020 पासून सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. दिनांक 2 सप्टेंबर 2020 पासून आंतर जिल्हा प्रवास व वाहतुकीकरिता वाहनास व व्यक्तीस वेगळ्या परवानगीची आवश्यकता राहणार नाही. तसेच खाजगी बस व मिनी बस या वाहनाद्वारे प्रवासाची वाहतूक करण्यास परिवहन विभागाच्या सुचनांनुसार मुभा देण्यात आली आहे. 

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनास/ थुंकण्यास व ई-सिगारेटसह धुम्रपानास सार्वजनिक  ठिकाणी प्रतिबंध करण्यात आला आहे. चेहऱ्यावर मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे इत्यादी आदेशाचे उल्लंघन केल्यास नियमानुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल.

सार्वजनिक ठिकाणी तंबाखु, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन, धुम्रपान करतांना व थुकतांना आढळल्यास रुपये 1000 रुपये दंड व 1 दिवस सार्वजनिक सेवा, दुसऱ्यांदा आढळल्यास रुपये 3000 दंड व 3 दिवसाची सार्वजनिक सेवा, तिसऱ्यांदा व त्यानंतर आढळल्यास रुपये 5000 दंड व 5 दिवस सार्वजनिक सेवा द्यावी लागेल. त्याचप्रमाणे सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न वापरणे यासाठी रुपये 200 दंड व तद्नंतर पुन्हा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल. दुकानदार, फळे, भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्यक वस्तु विक्रेते आणि ग्राहक यांनी सामाजिक अंतर न राखणे तसेच विक्रेत्यांनी मार्कींग न करणे यासाठी ग्राहकांना रुपये 200 दंड तर विक्रेत्यांना रुपये 2000 दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल. किराणा जिवनावश्यक वस्तू विक्रेत्याने वस्तूंचे दरपत्रक न लावणे यासाठी रुपये 2000 दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल.

सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादनांची जाहिरात करतांना आढळल्यास जाहिरात प्रतिबंध, व्यापार विनियमन आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण कायदा-2003 नुसार दंड आकारण्यात येईल. या कायद्यानुसार  कलम 4 अन्वये रुपये 200 दंड, कलम 5 नुसार पहिल्या गुन्ह्यासाठी 1000 दंड किंवा 2 वर्षे शिक्षा, दुसऱ्यांदा आढळल्यास रुपये 5000 दंड  किंवा 5 वर्षे शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा देण्यात येईल. तंबाखुजन्य पदार्थाच्या उत्पादनाकरिता  कलम 7 नुसार पहिला गुन्हा रुपये 5000 दंड किंवा  2 वर्ष शिक्षा, दुसरा गुन्हा रुपये 10000 दंड किंवा पाच वर्षाची शिक्षा, तसेच विक्रेत्यांकरिता पहिला गुन्हा 1000 दंड किंवा 1 वर्ष शिक्षा, दुसऱ्यांदा आढळल्यास रुपये 3000 दंड किंवा 2 वर्ष शिक्षा देण्यात येईल. वरील आदेश जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रे वगळता उर्वरित ग्रामीण व शहरी क्षेत्रास आदेशाचे दिनांकापासून लागू राहतील. 

सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांचेवर साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणी भारतीय दंड संहिता 1860 तसेच इतर संबंधीत कायदे व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com