अधिकारी आपत्ती व्यवस्थापनात व्यस्त : कोरोनाच्या सावटात वाळू तस्करांची चांदी 

file photo
file photo

यवतमाळ : महसूल व पोलिस प्रशासन कोरोनामुळे आपत्ती व्यवस्थापनात व्यस्त आहे. याचाच फायदा वाळूतस्कर उचलत आहेत. नदी, नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी सुरू आहे. त्यांना अटकाव करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंतची मजल वाळूतस्करांची गेली आहे. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण ही जिल्हा प्रशासनासाठी फार चिंतेची बाब आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून वाळूतस्करांच्या मुसक्‍या आवळणे गरजेचे आहे. 

जिल्ह्यात पैनगंगा, वर्धा, बेंबळा, अडाण, निर्गुडा, खुनी, पूस, अरुणावती, विदर्भा, वाघाडी आदी मोठ्या नद्या आहेत. या नद्यांच्या खोऱ्यात मोठ्याप्रमाणात वाळूचे साठे आहेत. यंदा काही प्रशासकीय अडचणीमुळे जिल्ह्यातील वाळूघाटांचे लिलाव झालेले नाहीत. मार्चपासून आजपर्यंत संचारबंदी होती. त्यामुळे बांधकाम थांबले होते. परंतु, संचारबंदी शिथिल होताच बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे वाळूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाळूचे भावही गगनाला भिडले आहेत. एका ट्रॅक्‍टरला पाच हजार रुपये मोजावे लागतात. तर, एका ट्रकसाठी 20 हजार द्यावे लागते. त्यामुळे या धंद्यातील उलाढालही कोट्यवधींच्या घरात आहे. 

नेत्यांच्या आशीर्वादामुळे सर्वकाही "आलबेल' 

साहजिकच या व्यवसायाला राजाश्रयदेखील असल्याचे जनता सांगते. तर, प्रशासनातील अनेक अधिकारी आणि कर्मचारीदेखील या व्यवसायाची पाठराखण करताना दिसतात. त्यामुळे महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय हा व्यवसाय चालू शकत नाही, हे सत्य असले तरी नेत्यांच्या आशीर्वादामुळे सर्वकाही "आलबेल' आहे. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांची तर या व्यवसायात भागीदारीच नव्हेतर मालकीदेखील आहे. त्यामुळे वाळूतस्कर सर्वसामान्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुमानत नाहीत. "एकच देव पुजायचा' याप्रमाणे ते मोठ्या अधिकाऱ्यांना किंवा नेत्यांना हाताशी धरतात आणि बिनबोभाटपणे आपला व्यवसाय करतात, अशी स्थिती आहे. परंतु, वाळूतस्करांना आवर घालताना मात्र सामान्य कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतू लागले आहे. 

म्हणून तलाठ्यांचे जीव वाचले 

उमरखेड व वणी तालुक्‍यातील कालपरवा घडलेल्या घटना या फार बोलक्‍या आहेत. शुक्रवारी (ता. 22) च्या रात्री पावणेदहा वाजता महागाव तालुक्‍यातील फुलसावंगी येथून दोन ट्रॅक्‍टर वाळूचे उमरखेडला येत असल्याची माहिती उमरखेडचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांना मिळाली होती. त्यांनी पंजाब सानप व गजानन सुरोशे या दोन तलाठ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यांनी उमरखेडपासून पाच किमी अंतरावरील चुरमुरा येथे वाळूने भरलेले दोन ट्रॅक्‍टर अडविले. मात्र, वाळूतस्करांनी त्या दोन्ही तलाठ्यांना मारहाण केली. शंभरावर गावकरी तलाठ्यांच्या मदतीला धावून आले म्हणून तलाठ्यांचे जीव वाचले. तोपर्यंत एक ट्रॅक्‍टर खाली करून पळून गेला होता. दुसरा ट्रॅक्‍टर लोकांनी पकडला. या प्रकरणात ट्रॅक्‍टरचा मालक मुजमीलखान, बबलू उर्फ अजीम इसाकखान पठाण व संदीप आडे (सर्व रा. फुलसावंगी) यांच्यावर उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 

महसूल अधिकाऱ्याच्या अंगावर घातली गाडी 

दुसरी घटना वणी तालुक्‍यातील आहे. गणेशपूर महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी महेंद्र देशपांडे यांना वाळूतस्करांकडून गुरुवारी (ता.21) सायंकाळी मारहाण झाली. याप्रकरणी वाहनचालकासह उमेश पोददार यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. तर, वणीत एका महसूल अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी चढविण्याचा झालेला प्रयत्न ही बाब फारच चिंताजनकच आहे. जिल्ह्यात दररोज कुठेना कुठे तहसीलदार, तलाठी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस वाळूतस्करांवर कारवाई करीत आहेत. याचाच अर्थ कोरोनाच्या सावटात वाळूतस्करी जोरात सुरू आहे. या वाळूतस्करीला महसूलच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांकडूनही पाठबळ मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. 

तहसीलदाराच्या बदलीची मागणी 

तर, महागावचे तहसीलदार नीलेश मडके यांचे वाळूतस्करांना पाठबळ असल्याने त्यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी एका आमदाराने वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. या वाळूतस्करीत चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम व वर्धा येथील तस्करांचा समावेश आहे. अगदी बोटीने वाळूचे उत्खनन केले जाते. रात्रभर वाळूउत्खनन सुरू असते. 


या तालुक्‍यांत होते वाळूतस्करी 

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी होते. पैनगंगा व खुनी नदीपात्र हे वाळूतस्करीचे अड्डे बनले आहेत. बाभूळगाव तालुक्‍यातील तांबा वाळूतस्करीसाठी राज्यात ओळखले जाते. तर वर्धा व बेंबळा संगम असलेले सावंगी (संगम) हा घाटदेखील वाळूतस्करीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. वणी, राळेगाव, बाभूळगाव, कळंब, उमरखेड, घाटंजी, आर्णी, दारव्हा व यवतमाळ ही तालुकेसुद्धा वाळूतस्करीची प्रसिद्ध तालुके आहेत. 

सर्वाधिक उत्खनन महागाव तालुक्‍यात 

महागाव तालुक्‍यातून पैनगंगा व खुनी या दोन नद्या वाहतात. या दोन्ही नद्यांचा हिवरा येथे संगम होतो. फुलसावंगी येथून सात किमी अंतरावरील शिरपुल्ली ते वरोडीपर्यंतचा 20 किलोमीटरचा पैनगंगेचा नदीकाठ हा वाळूघाट आहे. यंदा हर्रास न झाल्यामुळे वाळूतस्करांनी पैनगंगेतील वाळूचा चोरून नेली. वाळूचे सर्वाधिक अवैध उत्खनन या वाळूघाटात झाले आहे. विशेष, गेल्या वर्षी हा घाट दोन कोटी रुपयांना गेला होता. यंदा मात्र शासनाचा कोटींचा महसूल बुडाला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com