Bhandara Fire : कडक पोलिस बंदोबस्त; पण, रुग्णालयात शुकशुकाट; केवळ मीडियाच्या लोकांना प्रवेश

दीपक फुलबांधे
Sunday, 10 January 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुपारी भोजापूर येथे पीडित कुटुंबाला भेट देण्यास गेले होते. तेथून ते पावणेदोन वाजता रुग्णालयात आले. त्यांनी सर्वप्रथम रुग्णालयातील घटनास्थळ आणि वेगवेगळ्या विभागांना भेट देऊन तेथील कामकाज समजून घेतले. नंतर आढावा बैठकीत घटनेबाबत चर्चा केली.

भंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकांच्या अतिदक्षता कक्षात आग लागून १० बालकांचा मृत्यू झाल्यावर रुग्णालय परिसरात दुसऱ्या दिवशी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. मुख्य प्रवेशद्वार सकाळपासून बंद होते. परिसरात शुकशुकाट होता. रविवार असल्याने ओपीडी बंद होती. मात्र, रुग्णालयात भरती असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईकही बाहेर आले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या वेळीच परिसर थोडा गजबजला.

शनिवारी पहाटे जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांसाठी असलेल्या आयसीयूमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी अग्निशामक दलाला व डॉक्‍टरांना पाचारण केले. परंतु, आग विझविण्याच्या आधीच संपूर्ण कक्षात धूर पसरला. त्यामुळे सात बाळांचा गुदमरून, तर तीन बाळांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र, कर्मचाऱ्यांनी त्वरित वेगळी व्यवस्था करून उर्वरित सात बालकांना तेथे हलविण्याचे काम केले.

अधिक माहितीसाठी - कशी नशिबानं थट्टा आज मांडली!, स्मशानभूमीचा रस्ता अडविल्याने अंत्ययात्रा थांबली, अंत्यसंस्कारासाठी चार तासापासून प्रेत रस्त्यावर

शनिवारी सकाळीच या घटनेची माहिती होताच संपूर्ण राज्यात व देशात खळबळ उडाली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी, पालकमंत्री, अरोग्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांनी रुग्णालयाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच विरोधी पक्ष नेते, खासदार यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. आरोग्यमंत्र्यांनी चौकशी समिती गठित करून तीन दिवसांत अहवाल मिळल्यावर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

आज, रविवारी सकाळपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य दौऱ्यासंदर्भात रुग्णालयात पोलिस बंदोबस्त वाढवून मुख्य प्रवेशद्वार व अन्य प्रवेशमार्ग बंद ठेवण्यात आले. यावेळी केवळ ओळखपत्रधारक पत्रकारांनाच शेजारच्या लहान फाटकातून प्रवेश देण्यात आला. सकाळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयाची पाहणी केली. दरम्यान, बाहेरून येणाऱ्या सर्वच व्यक्तींना प्रवेश बंद होता.

जाणून घ्या - (Video) Bhandara Hospital fire news : दोनदा पडलो पण पत्नी आणि मुलाला सुखरूप बाहेर काढले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुपारी भोजापूर येथे पीडित कुटुंबाला भेट देण्यास गेले होते. तेथून ते पावणेदोन वाजता रुग्णालयात आले. त्यांनी सर्वप्रथम रुग्णालयातील घटनास्थळ आणि वेगवेगळ्या विभागांना भेट देऊन तेथील कामकाज समजून घेतले. नंतर आढावा बैठकीत घटनेबाबत चर्चा केली. नंतर पत्रकारांशी बोलले. पत्रकार परिषदेत रुग्णालयातील घटनेबाबत दुःख व्यक्त करूनत्यांनी मृत बालकांच्या कुटुंबांची कोणत्याही मदतीने भरपाई होणार नाही, अशी खंत व्यक्त केली. 

घटनेची पोलिसांत तक्रार

रुग्णालयातील जळीत कांडाची शनिवारी दुपारी भंडारा पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. सहायक शल्यचिकित्सक डॉ. एस. एस. बढे यांच्यातर्फे परिसेविका ज्योती शेखर भरसकरे यांनी पोलिस ठाण्यात येऊन ही तक्रार केली आहे. त्यानुसार शनिवारी पहाटे दीड वाजता एसएनसीयू मधील आउटबॉर्नमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागून धूर निघाला. या कक्षात भरती असलेल्या १७ पैकी १० बालकांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख या तक्रारीत आहे. सहायक पोलिस निरीक्षक केदार तपास करीत आहेत.

अधिक वाचा - एकाचवेळी पाच बालकांना हातात घेऊन शूर परिचारिकेची आगीतून धाव, मेयोमधील घटनेची अनेकांना आठवण

मुख्यमंत्री तासभर रुग्णालयात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तासभर जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात होते. ते दुपारी १.४५ ला रुग्णालयात आले. ४५ मिनिटे त्यांनी आग लागली त्या कक्षाची व अन्य विभागांची पाहणी केली. नंतर १५ मिनिटे आढावा घेतला. त्यांनंतर त्यांनी पत्रकारांशी १० मिनिटे चर्चा केली. ठिक २.४५ वाजता ते रुग्णालय परिसरातून निघून नागपूरकडे रवानवा झाले.

संपानद - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only media people access to the hospital Bhandara Hospital Fire