esakal | बोर व्याघ्र प्रकल्पात आढळली नारंगी छातीची हरोळी, वर्ध्यातील पहिलीच नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

orange breasted green pigeon found in bor tiger reserve wardha

पिवळ्या पायाची हरोळी या राज्यपक्ष्याशी साम्य असलेला पक्षी म्हणजे नारंगी छातीची हरोळी होय. या पक्ष्याचे सामान्य नाव ऑरेंज ब्रेस्टेड ग्रीन पिजन असून शास्त्रीय नाव ट्रेरान बायसिंट्‌स आहे.

बोर व्याघ्र प्रकल्पात आढळली नारंगी छातीची हरोळी, वर्ध्यातील पहिलीच नोंद

sakal_logo
By
रूपेश खैरी

वर्धा : विदर्भात काही मोजक्‍याच नोंदी असलेली नारंगी छातीची हरोळी बोर व्याघ्रप्रकल्पात आढळून आली. ही महत्त्वाची नोंद बहार नेचर फाउंडेशनचे पक्षीअभ्यासक दिलीप वीरखडे यांनी केली आहे. बोर व्याघ्रप्रकल्पांसह वर्धा जिल्ह्याच्या पक्षीवैभवात या नोंदीमुळे भर पडलेली आहे.

हेही वाचा - वर-वधू मंडपात उभे झाले, डोक्यावर अक्षता पडणार इतक्यात काही जण धडकले अन् उडाला थरकाप

पिवळ्या पायाची हरोळी या राज्यपक्ष्याशी साम्य असलेला पक्षी म्हणजे नारंगी छातीची हरोळी होय. या पक्ष्याचे सामान्य नाव ऑरेंज ब्रेस्टेड ग्रीन पिजन असून शास्त्रीय नाव ट्रेरान बायसिंट्‌स आहे. मुख्यत्वे पिवळ्या हिरव्या व राखी रंगाचा असलेला हा पक्षी; नराला नारंगी-केशरी रंगाचा छातीवर रुंद पट्टा असतो. मान, डोक्याचा काही भाग व गळ्याची खालील बाजू राखी रंगाची असते. मादीला नारंगी-केशरी रंगाचा छातीपट्टा नसतो. पाय तांबड्या रंगाचे असतात. एक-एकटे अथवा छोट्या थव्यात आढळणारा हा पक्षी मुख्यत्वे सदाहरित जंगलांमध्ये आढळतो. त्याचे स्थान म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली जंगले, उत्तराखंडपासून आसामच्या टेकड्यांपर्यंत. याशिवाय पश्‍चिम बंगाल, छोटा नागपूर, ओरिसा व पूर्वघाट तर दक्षिणेकडे पश्चिमघाटात आढळतो. त्याचे प्रमुख अन्न म्हणजे उंच व दाट झाडांची छोटी-छोटी फळे होय. 

हेही वाचा - सात महिलांनी नाकारले चक्क सरपंच पद, 'बाळू'साठी धरला हट्ट

बोर व्याघ्रप्रकल्प हे शुष्क पानझडीचे जंगल आहे. तथापि धरणाकडील बाजूस संमिश्र झाडी आहेत. याच परिसरात नारिंगी छातीची हरोळी एका पानगळ झालेल्या फांदीवर सकाळच्या कोवळ्या उन्हात आढळून आली. पक्षीनिरीक्षकांमध्ये दिलीप वीरखडेसह पार्थ वीरखडे, प्राजक्ता वीरखडे, गाईड शुभम पाटील व वाहनचालक सारंग वानखेडे यांचा समावेश होता. या महत्त्वाच्या नोंदीबद्दल बोर व्याघ्र प्रकल्पाचे  वनपरिक्षेत्राधिकारी नीलेश गावंडे, बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, डॉ. जयंत वाघ, आर्कि. रवींद्र पाटील, वैभव देशमुख, राहुल तेलरांधे, दीपक गुढेकर, दर्शन दुधाने, आशुतोष विचोरे, मनीष ठाकरे यांनी हरोळी निरीक्षकांचे अभिनंदन केले.