esakal | यवतमाळ जिल्ह्यात राज्यातील पहिला प्रयोग; बांधली तब्बल साडेतीनशे शौचालये
sakal

बोलून बातमी शोधा

over 350 public toilets build in Yavatmal district

"स्वच्छ भारत मिशन'अंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 47 हजार 264 शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा हागणदारीमुक्तीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे शौचालयाचा वापर अत्यल्प सुरू आहे.

यवतमाळ जिल्ह्यात राज्यातील पहिला प्रयोग; बांधली तब्बल साडेतीनशे शौचालये

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : राज्यातील एकमेव यवतमाळ जिल्हा परिषदेने गावपातळीवर सार्वजनिक शौचालय बांधकामाचा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात तब्बल 344 सार्वजनिक शौचालय पूर्ण झालेली आहेत. एकूण 98 शौचालयांचे काम प्रगतिपथावर असून, काही प्रमाणात का होईना गावांत उघड्यावर शौचास बसण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

"स्वच्छ भारत मिशन'अंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 47 हजार 264 शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा हागणदारीमुक्तीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे शौचालयाचा वापर अत्यल्प सुरू आहे. अशात यवतमाळ जिल्हा परिषदेने गावांत सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा पातळीवर शौचालयाची नोंदणी करण्यात आली. त्यात एकूण 442 सार्वजनिक शौचालयांची नोंदणी करण्यात आली होती. 

सविस्तर वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

गावातील सार्वजनिक शौचालयावर एकूण दोन लाख रूपये खर्च करण्याचे नियोजन होते. त्यातून 10 टक्‍के लोकवर्गणी व 90 टक्‍के निधी प्रशासनाने खर्च केला. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 344 शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात आलेले आहे. सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यात यवतमाळ जिल्हा राज्यात एकमेव ठरला आहे. परिणामी, आता तरी नागरिक शौचालयाचा वापर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

त्यातील 98 शौचालयांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. येत्या काळात सार्वजनिक शौचालयांची नोंदणी पंचायत समितीस्तरावर करण्यात येणार आहे. आतापर्यंत स्वच्छ भारत मिशनकडे जवळपास 70 ते 80 सार्वजनिक शौचालयांची नोंदणी झाली असून, ही नोंदणी गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यात आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

बांधलेल्या शौचालयांची तालुकानिहाय संख्या

आर्णी तालुक्‍यात 29, बाभूळगाव 18, दारव्हा 12, दिग्रस 24, घाटंजी 33, कळंब 12, केळापूर 28, महागाव 16, मारेगाव 19, नेर 28, पुसद 21, राळेगाव 29, उमरखेड 18, वणी 21, यवतमाळ 28, झरी जामणी आठ.

हेही वाचा - आता बांबूच्या बाटलीने प्या पाणी, नैसर्गिक चवीसोबत आरोग्याचंही रक्षण

जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. लवकरच ही कामे पूर्ण होतील. ग्रामीण भागातील सर्वांनीच शौचालयाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. शौचालयाचा वापर केल्यास रोगराईपासून दूर राहता येईल.
- मनोजकुमार चौधर, 
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छ भारत मिशन, यवतमाळ.

संपादन - अथर्व महांकाळ