"अनुकंपा'च्या नोकर भरतीला "लकवा' 

file photo
file photo

नागपूर :  शासकीय सेवेत असलेल्या घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी मिळावी अशी भाबडी आशा असते. मात्र, त्या आशेवरही पाणी फेरण्याचे काम सरकार करीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा यादीत असलेल्यांना अद्याप नोकरीचे साधे पत्र मिळाले नाही. सरकारच्या नोकरबंदीचा फटका या अनुकंपाधारकाना बसल्याचे धक्‍कादायक चित्र राज्यात आहे. राज्यातील एक लाखावर उमेदवार शासकीय सेवेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळेल, या आशेवर आहेत. 

अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद 

राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या मुलाला किंवा कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहेत. शासकीय सेवेत कार्यरत असताना कर्मचारी नक्षलवादी, आतंकवादी, दरोडेखोर किंवा काही आत्मघाती, समाजविघातक हल्ल्यात किंवा कारवाईप्रसंगी कायमस्वरूपी अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास, अशा कर्मचाऱ्यांच्या मुलांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद आहे. या कर्मचाऱ्यांच्या मुलांची नियुक्‍ती करताना वेगळी सूची करण्यात यावी, असे सरकारचे निर्देश आहेत. राज्य सरकारच्या "क' आणि "ड' गटातील पदावर सरळप्रवेश भरतीने ही नियुक्‍ती करता येईल. याकरिता निवड मंडळाचा सल्ला किंवा परवानगी घेण्याची गरज नाही, असेही शासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. तर लोकसेवा कक्षातील पदावर ही नियुक्‍ती करता येणार नाही, असेही आदेश सांगतो. 

भरतीची प्रक्रिया मंदावली 

राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये अनुकंपा तत्त्वावरील भरतीची प्रक्रिया मंदावली आहे. अनेक विभागांमध्ये अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवारांची संख्या वाढत आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांत एक लाखापेक्षा अधिक उमेदवार प्रतीक्षा यादीत आहेत. सरकारकडून गेल्या काही वर्षांमध्ये भरतीवर अंकुश लावण्यात आला होता. त्याचा परिणाम म्हणजेच विविध विभागांत उमेदवारांची प्रतीक्षा यादी वाढत असून ती प्रतीक्षा यादीच्या दुखण्यामुळे उमेदवारांमध्ये नैराश्‍य निर्माण झाले आहे. 
नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामाईक सूचीमध्ये 408 उमेदवारांची नोंद आहे. तसेच वर्ग चार पदांकरिता 205 तर वर्ग तीनसाठी 14 आणि वर्ग दोन पदांकरिता 14 उमेदवार प्रतीक्षा यादीत आहेत. तसेच नागपूर जिल्हा परिषदेतील अनुकंपा तत्त्वावरील यादीचा विचार केल्यास सामाईक सूचीमध्ये 311 उमेदवार नोकरीची प्रतीक्षा करीत आहेत. तसेच विविध विभागांतील पदाचा विचार केल्यास उमेदवारांची संख्या अधिक आहे. तसेच स्थानिक पातळीवर विविध विभागांतही अनुकंपा तत्त्वावरील यादीमध्ये उमेदवारांची संख्या अधिक आहे. 

माहिती देण्याची जबाबदारी सरकारचीच 

वरीलपैकी कोणत्याही कारणाने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असल्यास अनुकंपा नोकरीबाबत 15 दिवसांच्या आत कुटुंबीयांना माहिती देणे सरकारला किंवा संबंधित विभागाला बंधनकारक आहे, तसेच निवृत्तिवेतन काढताना आवश्‍यक त्या कागदपत्रांसोबतच पदासाठी आवश्‍यक पात्रता काय आहे, याची माहिती देणेही सक्‍तीचे आहे. 

अज्ञान वारस सज्ञान झाल्यानंतर मिळेल नोकरी 

एखाद्या कर्मचाऱ्याचा वारस अज्ञान असेल तर तो सज्ञान झाल्यानंतर एक वर्षाच्या आत त्याला नोकरी देणे बंधनकारक आहे. परंतु, आपण सज्ञान झाल्याचा अर्ज संबंधित विभागात देणे आवश्‍यक आहे. 

प्रतीक्षा यादी कमी करावी 

गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवारांची संख्या वाढत आहे. परंतु, सरकार ती कमी करण्यावर गंभीर नसल्याचे दिसून येते. यामुळे येणाऱ्या काळात अनुकंपा तत्त्वावरील यादीत असलेल्या उमेदवारांचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही राजानंद कावळे यांनी दिला आहे.  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com