वाघाच्या हल्ल्यात तरुण जखमी, वनविभागाने वाढविली गस्त

सूरज पाटील
Sunday, 29 November 2020

पांढरकवडा, राळेगाव, घाटंजी व महागाव आदी प्रमुख तालुक्‍यांत वन्यप्राण्यांकडून शेतकरी, मजूर, गुराख्यांवर हल्ला होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

यवतमाळ : घाटंजी तालुक्‍यात येणाऱ्या कुर्लीवन क्षेत्रातील कक्ष क्रमांक 148 मध्ये झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने गुराख्यावर हल्ला करून जखमी केले होते. ही घटना घडताच वनविभागाने या वनक्षेत्रात गस्त वाढविली आहे. जखमी व्यक्तीला लवकरच मदत देण्यात येईल, असे आश्‍वासन वनविभागाकडून देण्यात आले आहे.

हेही वाचा - नक्षलवाद्यांशी लढणारे हात सरसावले बेरोजगारांसाठी, १४०...

पांढरकवडा, राळेगाव, घाटंजी व महागाव आदी प्रमुख तालुक्‍यांत वन्यप्राण्यांकडून शेतकरी, मजूर, गुराख्यांवर हल्ला होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. वनक्षेत्रात शेती कामाला जाण्याची हिंमत शेतकरी करताना दिसत नाहीत. घाटंजी तालुक्‍यातील वघारा (टाकळी) येथील सेनापती बिजाराम राऊत (वय 36) हा 26 नोव्हेंबरला सांयकाळी पाचच्या सुमारास शेळ्या चारत असताना वाघाने अचानक हल्ला चढविला. यावेळी त्याच्यासोबत असलेला सूरज निकोडे याने घटनास्थळावरून पळ काढला. हल्ला करताच वाघाने जंगलाकडे धूम ठोकली. ग्रामस्थांनी लगेच ही माहिती वनविभागाच्या पथकाला दिली. पारवाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ जखमीला ग्रामीण रुग्णालयात हलविले.

हेही वाचा - 'आधी सोयाबीन सडला, कापूसही करपला; आता तुरीवरही...

प्राथमिक उपचारानंतर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. आता या तरुणाची प्रकृती स्थिर असून, सुट्टी मिळताच वनविभागाकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे. वाघाच्या हल्ल्यामुळे कुर्ली सहवन क्षेत्रातील शेतकरी भयभीत झाले आहेत. वाघाच्या हल्ल्यात आणखी कुणी जखमी होऊ नये, यासाठी वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली आहे. याशिवाय परिसरातील गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा - मुख्याध्यापक संघटनेचा खळबळजनक दावा; तब्बल ७० टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून...

वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे. त्याला सुटी मिळताच वनविभागाच्या नियमानुसार मदत देण्यात येईल. वनपरिसरात कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली आहे.
-एस. व्ही. रामाराव, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), यवतमाळ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The patrol was intensified by the forest department due to the tiger attack in ghatanji of yavatmal