दिवाळीत कोरोनाचे भय झाले दूर, नागरिकांचा खरेदीवर जोर

people crowd at pusad market for diwali shopping
people crowd at pusad market for diwali shopping

पुसद (यवतमाळ) : वसूबारस व धनतेरसनंतर आज शनिवारी (ता.14) दीपावलीच्या मुख्य दिवशी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. प्रकाशपर्वाच्या सणात नागरिकांच्या आनंदाला उधाण आले आहे. ग्रामीण भागातील कृषी जीवनात दीपावलीच्या आगमनाचा वेगळाच ओलावा दाटून आलेला आहे. कोरोनाने पूर्णत: निरोप घेतला नसताना बाजारातील गर्दीला कुणीही रोखू शकले नाहीत. कोरोना काळातही दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक सुसाट सुटले आहेत.

शेतीत संकटांची मालिका अंगावर झेलत बळीराजा दिवाळीच्या स्वागतासाठी आतुर झाला आहे. खरेतर, दिवाळी हा सुगीचा सण. जीवनातील अंधकार दूर करणारा प्रकाशपर्वाचा आनंदक्षण. भारतीय संस्कृतीतील जीवनात ऊर्जा भरणारा उजेडाचा उत्सव. शेतकरी व श्रमिकांना उसंत देत नवीन शक्ती, उत्साह प्रदान करणारा लक्षदिव्यांचा सोहळा. सहाजिकच घरातील व मनावरील जळमटे दूर करून स्वच्छता व मांगल्याचा संदेश देणारा दिवाळी सण प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. यवतमाळ शहरांप्रमाणेच कोरोनाच्या काळातही गावखेड्यांतून आलेल्या लोकांनी तुडुंब भरलेली बाजारपेठ पाहताना दिवाळी सणाच्या उत्साहाची खात्री पटते.

दिवाळी सण गोरगरीब श्रमिकांपासून श्रीमंतापर्यंत सर्वजण आपापल्या परीने साजरा करतात. दिवाळीच्या फराळासोबत नात्यांचा गोडवाही यावेळी फुलून येतो. भाऊ-बहिणीच्या नात्याला भाऊबिजेला उजाळा मिळतो. नवीन कपडे, नव्या खरेदीला उधाण येते. लक्ष्मीपूजनाच्या रात्री असंख्य दिव्यांच्या प्रकाश ज्योती अमावस्येच्या अंधाराला चिरत नवी प्रकाशवाट जिवंत करतात. तमाला दूर सारून जीवनात आनंद निर्माण करतात. संकटांची काजळी दूर करण्याचा संदेश नरकचतुर्दशीतून मिळतो. दिवाळी म्हणजे आनंदाची आळंदी. माऊलीला आळवीत वारकरी असलेल्या शेतकऱ्यांची पाऊले परत शेतीसृजनात दंग व्हावी, हाच दीपपर्वाचा अन्वयार्थ आहे.

दीपावलीत श्रमिक व रस्त्यावर पथारी पसरून मातीचे दिवे, झाडू, रांगोळी, महालक्ष्मीच्या मूर्ती, आकाश कंदील, पूजेचे साहित्य अशा अनेक वस्तू विक्रेत्यांच्या व्यवसायाला बरकत येते व त्यांच्या पदरात लक्ष्मी पडताच त्यांचेही जीवन उजळून निघते. या श्रमिकांना दिवाळीचा आनंद लुटता यावा, म्हणून संवेदनशील मनाचे लोक त्यांच्याकडून भावाची घासाघीस न करता दिव्यांची व इतर वस्तूंची खरेदी करतात. हा माणुसकीचा जिव्हाळा जपला तर श्रमिक व वंचितांच्या घरातील दिवाळीही चेहऱ्यावर फुटणाऱ्या हसूतून नक्कीच लखलखीत होईल. म्हणूनच कवी म्हणतो ते अगदी खरं आहे.

"दिवे लागले रे दिवे लागले, 
तमाच्या तळाशी दिवे लागले.
दिठींच्या दिशा खोल तेजाळताना,
कुणी जागले रे कोणी जागले."

गर्दीने रस्ते फुलले -
दिवाळीसणाच्या खरेदीसाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडलेत. नवीन कपडे, किराणा, लक्ष्मीपूजनासाठी मूर्ती, दिवे, आकाशदिवे, फटाके आदींची लिस्ट घेत नागरिक बाजारपेठेत आले. गर्दीने शहरातील मुख्य चौकातील रस्ते फुलून गेले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com